कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर, ‘एनएमआरडीए’मध्ये सामंजस्य करार
मुंबई : नागपूर महानगर क्षेत्रातील कोराडी तालुका कामठी या ठिकाणी पर्यावरणीय पर्यटन स्थळ (ईको टुरिझम) विकसित करण्यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) आणि महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (महाजनको) यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड या कंपनीची २३२.६४ हे. आर. जागा नागपूर प्रदेश विकास प्राधिकरणाला ३० वर्षाच्या भाडे करारावर प्रतिवर्ष १ रूपये भाडेपट्टयावर हस्तांतरीत करण्यात येणार आहे.
महाजेनको कंपनीने भाडे कराराने दिलेली जागा मौजा कोराडी, मौजा महादुला, मौजा खापरखेडा, मौजा नांदा (तालुका कामठी) आणि मौजा घोगली ता. नागपूर (ग्रामीण) या भागात आहे. ही जमीन नैसर्गिक संसाधनांच्या सान्निध्यात असून, जागतिक दर्जाचे पर्यावरणीय पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी उपयुक्त आहे. या उपक्रमाचा मुख्य आधार शाश्वत जलकेंद्रित विविध कार्यक्रम आहे. नॉन-मोटरायइड बोटिंग (पॅडल बोट्स, कायाक्स, कॅनू), पर्यावरणपूरक शिकारा आणि फ्लोटिंग डेक राइड्स, फ्लोटिंग प्लॅटफॉर्मवरून पक्ष्यांचे निरीक्षण, निसग पर्यटन हे उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येणार आहेत.
प्राधिकरणाला दिलेली जमीन ही नागपूरच्या महत्त्वाच्या शहरी आणि नैसर्गिक संसाधनांच्या जवळ असल्यामुळे, जागतिक दर्जाचे पर्यावरण पर्यटन स्थळ म्हणून तिचा विकास केला जाणार आहे. हा उपक्रम पर्यटन उद्योगास चालना देईल, स्थानिक लोकांना रोजगाराच्या नवीन संधी देईल व परिसराचा सामाजिक-आर्थिक विकास सशक्त करेल, प्रकल्प उभारणीत पर्यावरण संरक्षणाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
• कराराची मुदत : सुरुवातीला ३० वर्षे, वार्षिक केवळ १ रुपये भाडे, व त्यानंतर वाढीव मुदतीचा पर्याय उपलब्ध
• महाजेनकोचे अधिकार : सध्याच्या थर्मल पॉवर स्टेशन आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र यांच्यावर पूर्ण मालकी व नियंत्रण कायम राहणार.
• प्राधिकरणाचे अधिकार : तलावाच्या जलपृष्ठभागाचा वापर फक्त पर्यावरण पर्यटन प्रकल्पासाठी करण्याचे विशेष हक्क एनएमआरडीएला दिले जातील.
• महाजेनकोच्या संचालक मंडळाने या प्रस्तावास मान्यता दिली आहे.