राज्याला मुसळधार पावसाने झोडपले; मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र अतिमुसळधार पाऊस, आता पुढील 48 तास... (संग्रहित फोटो)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होत आहे. तर मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस होताना दिसत आहे. रविवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने दैना उडवली असून, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह कोकणपट्ट्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. तसेच पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
हिंगोली, अहिल्यानगरलाही पावसाने झोडपून काढले. हिंगालीत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने चार दिवसांपासून 10 गावांचा संपर्क तुटला, तर आष्टी-पाथर्डी तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला असून, 30 गावांचा संपर्क तुटला आहे. धाराशिव जिल्ह्यातील तब्बल 42 महसूल मंडळांपैकी 24 मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावली असून, आतापर्यंत अडीच लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत.
हेदेखील वाचा : Monsoon Update: मुंबई पुन्हा पाण्यात, पावसाची संततधार; महाराष्ट्र-दिल्लीचे वातावरण, मोनोही अडकली
दरम्यान, शेताबरोबरच गावातील घरांमध्येही पाणी शिरल्याने अनेकांना संसार उघड्यावर मांडण्याची वेळ आली आहे. परंडा महसूल मंडळासह धाराशिव तालुक्यातील तेरसह परिसरात जोरदार पावसामुळे तेरणा नदी तुडुंब भरून वाहत आहे. या नदीकाठावरील कामेगाव, बोरगाव राजे, बोरखेडा, सांगवी, दाउतपूर, ईर्ला, समुद्रवाणी आदी गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तूर, खरीपासर इतर धान्यावर परिणाम
सोयाबीन, मूग, उडीद, मका आणि तूर या खरीप पिकांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील 5 लाख 54 हजार हेक्टर क्षेत्रापैकी सर्वाधिक पेरणी सोयाबीनची असून सोयाबीन भिजून खराब झाले आहे. शेतात पाणी साचल्याने उभे सोयाबीन पीक नासण्याची भीती आहे. कामेगाव, बोरगाव राजे, सांगवीसह गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईतील अनेक भागांत साचलं पाणी
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. रविवारी रात्री उशिरापासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. त्यातच आता मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले. सकाळी किंग्ज सर्कल परिसरातील रस्ते कालव्यांसारखे दिसत होते. त्याच वेळी मुंबईच्या वडाळा परिसरात तांत्रिक बिघाडामुळे एक मोनोरेल थांबली. त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला.