पिंपरी : चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक (Chinchwad Bypoll) होणार आहे. भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज असलेल्या त्यांच्या कुटुंबातील एकाने उमेदवारी अर्ज भरला आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाट्यमय घडामोडी घडत आहेत. मोरया गोसावीचं दर्शन घेऊन अश्विनी जगताप यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि अर्जही भरला आहे. तर दुसरीकडे लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप (Shankar Jagtap) यांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पोटनिवडणुकीसाठी अगोदरपासूनच इच्छुक
चिंचवड पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासूनच शंकर जगताप इच्छुक होते. पण, त्यांच्याऐवजी अश्विनी जगताप यांना तिकीट देण्यात आले आहे. मात्र, आज अचानक शंकर जगताप यांनी अर्ज भरल्यामुळे कार्यकर्ते गोंधळात पडले. पण लक्ष्मण जगताप यांचा हा डमी अर्ज असल्याचा खुलासा भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.
निवडणुका बिनविरोध होण्यासाठी राज ठाकरेंचेही पत्र
कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी मनसेने काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीयांना पत्र लिहिले होते. त्यामध्ये ‘जेव्हा पोटनिवडणूक लागते तेव्हा अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो. अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही’, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, तरीही या निवडणुका बिनविरोध होणार नसल्याचे दिसत आहे.