जीर्ण इमारतीत ३११ विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! छताची गळती, पोषण आहाराचा तुटवडा; लिपिकाचे पद २० वर्षांपासून रिक्त
यवतमाळ नगरपरिषद शाळांना ‘स्मार्ट’ करण्याच्या गप्पा सुरू असतानाच तहसील कार्यालयासमोरील नगरपरिषद शाळा क्रमांक २० अर्थात पीएमश्री. माँ जिजाऊ न.प. मुला-मुलींची शाळा मात्र मूलभूत सुविधांसाठी झगडत असल्याचे वास्तव आहे. तब्बल ३११ विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या शाळेची इमारत जीर्ण झाली असून पावसाळ्यात छत गळत आहे. पोषण आहाराचा तुटवडा, स्वच्छतेचा अभाव, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि प्रशासकीय पदे रिक्त आहे. शाळेची स्थापना १९०१ मध्ये झाल्याने इमारतीला शंभर वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. भिंती आणि छताची अवस्था जीर्ण झाली असून पावसाळ्यात छत गळत असल्याने विद्यार्थ्यांना वर्गात बसविणे धोकादायक ठरत आहे. जीर्ण वास्तू कधी अपघाताला निमंत्रण देईल, याची शाश्वती नसताना नाही. केवळ शाळेची बाहेरून डागडुजी सुरू आहे.(फोटो सौजन्य – AI)
विशेष म्हणजे शाळेत पाच स्मार्ट बोर्ड, सीसीटीव्ही कॅमेरे आणि सायन्स लॅबसारख्या सुविधा आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचे छतच सुरक्षित नसेल, तर या ‘स्मार्ट’ सुविधांचा उपयोग काय, असा संतप्त सवाल पालक करत आहेत.विद्यार्थीसंख्या वाढावी आणि पालकांचा नगरपरिषद शाळांकडे कल वाढावा, यासाठी शिक्षकांनी स्वतःच्या पुढाकारातून नर्सरी, केजी-१ आणि केजी-२चे वर्ग सुरू केले आहेत. सुमारे ४० विद्यार्थी या वर्गात शिक्षण घेत आहेत. अवघ्या ७०० रुपयात गणवेश व पुस्तकांचा संच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही सुरू आहे. मात्र या उपक्रमासाठी शासनाकडून विशेष निधी मिळत नसल्याची खंत शिक्षकांनी व्यक्त केली.
नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके यांनी शाळेला दोन वेळा भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. मात्र भेटीनंतर आश्वासने मिळाली असली तरी सफाई कर्मचारी, छताची गळती, जीर्ण इमारत आणि इतर मूलभूत सुविधांबाबत अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. इतर शाळांच्या प्रश्नांप्रमाणेच शाळेत काही दिवसांपासून पोषण आहाराचा नियमित पुरवठा होत नसल्याची पालकांची तक्रार आहे. उपलब्ध शिल्लक धान्याच्या आधारे विद्यार्थ्यांना आहार देण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. पुरवठ्याबाबत वारंवार तक्रारी करूनही ठोस तोडगा निघालेला नसल्याने शाळा व्यवस्थापनाची कोंडी झाली आहे.
३११ विद्यार्थ्यांच्या शाळेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी अर्थात चपराशीच नसल्याने स्वच्छता, देखभाल आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी शिक्षकांवर येत आहे. त्यातच लिपिकाचे पद जवळपास २० वर्षांपासून रिक्त असल्याची माहिती आहे. त्यामुळे शैक्षणिक कामासोबत प्रशासकीय जबाबदाऱ्यांचाही अतिरिक्त भार शिक्षकांवर पडत आहे. ही दोन्ही पदे तातडीने भरण्याची मागणी होत आहे.
Ans: दिलेल्या माहितीनुसार, या जीर्ण इमारतीत ३११ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
Ans: शाळेच्या इमारतीची अवस्था जीर्ण असून छताला गळती लागल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Ans: दिलेल्या माहितीनुसार, शाळेत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पोषण आहाराचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पोषण आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.