बारामती: अमोल तोरणे – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लक्षवेधी लढतीमध्ये विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी १ लाख ५३ हजार १८ मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दणदणीत पराभव करून आपले वर्चस्व निर्विवाद कायम राखले. या लोकसभा मतदारसंघांमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पॉवर मतदारांनी कायम ठेवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का दिला. विशेषता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्राबल्यखाली असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळाल्याने अजित पवार यांची चिंता वाढली आहे.
हाय व्होल्टेज मतदार संघ असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघामध्ये खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सूनेत्रा पवार अशी लढत झाल्याने नक्की बाजी कोण मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व महायुतीच्या बाजूने दिग्गज नेते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर असल्याने सुप्रिया सुळे यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले होते. ही निवडणूक सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी जरी असली तरी अप्रत्यक्षरीत्या ज्येष्ठ नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार अशीच मानली जात होती. शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांचे वर्चस्व कायम राहावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून आपल्या पद्धतीने मोर्चे बांधणी सुरू केली होती. त्यांनी स्वतः जुन्या शिलेदारांशी संपर्क साधून त्यांना सक्रिय राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रभावी नेत्यांची त्यांनी संपर्क केला होता.
इंदापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्यासाठी सक्रिय प्रचार केला. या मतदारसंघातील प्रवीण माने यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून फारकत घेत महायुतीमध्ये ते सक्रिय राहिले. दौंड मध्ये राहुल कुल व राष्ट्रवादीचे नेते रमेश थोरात यांनी, पुरंदर विधानसभा मतदारसंघातून माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी आमदार अशोकराव टेकावडे खडकवासल्यातून भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी महायुतीचा सक्रिय प्रचार केला. तर सुप्रिया सुळे यांचा प्रचार इंदापूर मधून पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, पुरंदर मधून काँग्रेसचे आमदार संजय जगताप, भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी आघाडीचा धर्म पाळून सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला. या लोकसभा मतदारसंघातील भाजपचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते पुणे तर पवार यांचा सक्रिय प्रचार करत होते. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे वगळता अन्य एकही पदाधिकारी शरद पवार गटाच्या गळाला लागला नाही, ही महायुतीसाठी जमेची बाजू होती. या तुलनेत सुप्रिया सुळे यांच्याकडे यंत्रणेचा मोठा अभाव होता. तरीदेखील ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा प्रभाव या मतदारसंघांमध्ये असल्याने सर्वसामान्य जनतेने शरद पवार यांच्या बाजूने कौल देत सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात मताधिक्य दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने तसेच भाजपने मोठी ताकद पणाला लावून देखील शरद पवार यांच्या झंजावाता पुढे ही ताकद टिकली नाही, हे या निकालावरून स्पष्ट होत आहे.
दरम्यान मतमोजणीच्या प्रारंभी सुनेत्रा पवार आघाडीवर होत्या, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये तसेच महायुतीमध्ये चैतन्य निर्माण झाले होते. मात्र काही वेळातच सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य वाढू लागले, सुरुवातीला पाच हजाराहून अधिक असणारे मताधिक्य दहाव्या फेरीमध्ये ४८ हजाराहून अधिक मताधिक्य सुप्रिया सुळे यांना मिळाले.
यानंतर बारामती शहरातील भिगवण चौक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयासमोर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलाल व हळद उधळत जल्लोष सुरू केला. वाद्यांच्या गजरात कार्यकर्ते व पदाधिकारी जल्लोष करत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सत्यव्रत काळे यांनी उद्या दिनांक ५ जून रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत हा जल्लोष सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान बारामती शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कसबा तसेच शारदा प्रांगण या ठिकाणी असलेल्या पक्ष कार्यालयात मोठा शुकशुकाट होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी दहा पासून मोठी गर्दी केली होती. सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य वाढू लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार हे बारामती शहरातील पक्ष कार्यालयात आले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत करत “महाराष्ट्राचा एकच आवाज, शरद पवार! शरद पवार!!, ” “खासदार सुप्रियाताई सुळे यांचा विजय असो!!”अशा घोषणा देत जल्लोष केला.
दिवसभर बारामती शहरातील भिगवण चौक या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण सुरू होती. दरम्यान मतमोजणीच्या पूर्वसंध्येला इंदापूर शहरांमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर लागले होते, बारामती तालुक्यातील पिंपरी या ठिकाणी देखील त्यांच्या विजयाचे बॅनर लागले होते. मात्र आजच्या निकालामध्ये सुप्रिया सुळे यांनी मोठे आघाडी घेतल्यानंतर सदर बॅनर काढण्यात आले. बारामती शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये तसेच इतर विधानसभा मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.
दरम्यान नणंद विरुद्ध भावजय या अत्यंत चुरशीच्या लढतीत सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्याने विजय होतील असा दावा अजित पवार गटाकडून केला जात होता. अजित पवार यांच्या बाजूने दिग्गज नेते व पदाधिकारी असल्याने शेवटच्या क्षणी सुप्रिया सुळे यांना विजयासाठी मोठा अडसर ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. निवडणूक निकालाच्या सुरुवातीला चिंतेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सुळे यांनी लीड घेतल्यानंतर निश्चिंत होऊन त्यांनी जल्लोष सुरू केला. दरम्यान बारामतीकरांनी शरद पवार यांच्या बद्दल या मताधिक्याच्या रूपाने एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त केल्याची भावना अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. सुनेत्रा पवार यांच्या पराभवापेक्षा बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये सुळे यांना अधिकचे मिळालेले मताधिक्य हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान या विजयानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील मतदारांचे आभार व्यक्त केले आहेत.