मुंबई : लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सध्या सुरु आहे. देशभरातील सर्वांचे लक्ष हे लोकसभेच्या निकालाकडे लागले असून भाजप सत्तेची हॅटट्रीक करणार का याकडे लक्ष केंद्रीत झाले आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महिलांचा देखील मोठा समावेश दिसून येत आहे. देशासह राज्यातील अनेक मतदारसंघामध्ये महिला शक्ती दिसून आली आहे. अनेक प्रतिष्ठेची लोकसभा मतदारसंघाकडून महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये भाजपच्या काही महिला या पिछाडीवर असून एनडीएच्या महिला उमेदवार आघाडीवर आहेत.
राज्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. पवार कुटुंबातील दोन्ही उमेदवारांमध्ये ही लढत झाली असून शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे व अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्यामध्ये झाली आहे. या नणंद भावजयमध्ये चुरशीची लढत झाली असून निवडणूकीच्या मतमोजणीमध्ये सध्या सुप्रिया सुळे आघाडीवर दिसत आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये काही काळ सुनेत्रा पवार पुढे होत्या. मात्र आता पुढील पाचही टप्प्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. आता सुप्रिया सुळे या 21 हजारांनी आघाडीवर आहेत. भाजपकडून बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पंकजा मुंडे यांना पहिल्या टप्प्यामध्ये जोरदार धक्का बसला होता. सततच्या पिछाडीमुळे भाजपची चिंता वाढली होती. मात्र आता पंकजा मुंडे या आघाडीवर आल्या आहेत. पंकजा मुंडे या 9000 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे बीडचे निकालाचे पारडे भाजपच्या बाजूने झुकत असल्याचे दिसत आहे.
भाजपच्या ‘या’ महिला उमेदवार पिछाडीवर
राज्यामध्ये लोकसभा निवडणूकीची रंगत वाढली असून अनेक मतदारसंघामध्ये आश्चर्यकारक निकाल येत आहेत. अमरावतीमधून नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिली होती. नवनीत राणा यांच्या उमेदवारीसाठी भाजपने महायुतीमधील बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेची नाराजी घेतली. यामुळे महायुतीमध्ये अमरावतीसाठी अंतर्गत उमेदवाराविरोधात देखील लढा द्यावा लागला. त्याचबरोबर नवनीत राणा या विद्यमान खासदार असताना देखील पिछाडीवर आहेत. त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. अमरावतीमध्ये बळवंत वानखडे हे आघाडीवर असून नवनीत राणा या पिछाडीवर आहेत. त्याचबरोबर सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यापासून प्रणिती शिंदे यांनी आपला गड राखण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. पहिल्या टप्प्यापासून आघाडीवर असलेल्या प्रणिती शिंदे या आता पिछाडीवर आहेत. त्यांच्या विरोधातील राम सातपुते 2 हजारांनी पुढे आहेत.