
महाबळेश्वर नगराध्यक्ष सुनील शिंदे यांची पश्चिम महाराष्ट्र नगर परिषद महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड
महाबळेश्वर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धतीने उल्लेखनीय ठसा उमटवणारे आणि जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर शहराच्या विकासाला एक नवी, आधुनिक दिशा देणारे लोकप्रिय नगराध्यक्ष सुनील लक्ष्मण शिंदे यांची ‘पश्चिम महाराष्ट्र नगर परिषदा महासंघाच्या’ उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
महासंघाच्या नुकत्याच पार पडलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उच्चस्तरीय बैठकीत या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. सुनील शिंदे यांच्या या महत्त्वपूर्ण निवडीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील नगर परिषदांच्या संघटन पातळीवर महाबळेश्वर शहराचे राजकीय आणि प्रशासकीय वजन अधिक मजबूत झाले असून, संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाबळेश्वर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेतून थेट आणि भरघोस मताधिक्याने निवडून आलेले सुनील शिंदे हे त्यांच्या संयमी, सर्वसमावेशक आणि विकासकामे तळागाळातील सामान्य माणसांपर्यंत पोहचवण्याच्या कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात.
महाबळेश्वर हे केवळ एक शहर नसून आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख पर्यटन केंद्र आहे. अशा शहराचा सुनियोजित विकास करताना पायाभूत सुविधा, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि पर्यटकांसाठीच्या सोयी-सुविधा यांचा ताळमेळ राखणे अत्यंत आव्हानात्मक असते. सुनील शिंदे यांनी आपल्या प्रशासकीय कसबाच्या जोरावर हे आव्हान, पेलले आहे. त्यांच्या याच दांडग्या अनुभवाची आणि कुशल नेतृत्वाची दखल घेऊन महासंघाने त्यांच्या खांद्यावर ही मोठी प्रादेशिक जबाबदारी सोपवली आहे.
प्रादेशिक विकासाला गती मिळणार
पश्चिम महाराष्ट्र नगर परिषदा महासंघ ही या भागातील सर्व लहान-मोठ्या नगर परिषदांचे प्रतिनिधित्व करणारी एक अत्यंत महत्त्वाची संघटना आहे. या महासंघाच्या उपाध्यक्षपदी महाबळेश्वरच्या नगराध्यक्षांची निवड होणे ही संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी आणि विशेषतः महाबळेश्वरवासीयांसाठी अभिमानाची गोष्ट मानली जात आहे. या निवडीमुळे आता पश्चिम महाराष्ट्रातील नगर परिषदांच्या विविध धोरणात्मक निर्णयांमध्ये महाबळेश्वरचे नेतृत्व अग्रभागी असणार आहे, ज्याचा फायदा आगामी काळात प्रादेशिक विकासाला गती देण्यासाठी होईल.
माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार
महाराष्ट्र नगर परिषदा महासंघाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. महासंघाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व लहान-मोठ्या नगर परिषदांचे प्रलंबित प्रश्न, विकास आराखडे आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी प्राधान्याने प्रयत्न करेन. महाबळेश्वरच्या जनतेने आणि पक्ष नेतृत्वाने दिलेल्या ताकदीमुळेच मला हा बहुमान मिळाला आहे.”
– सुनील शिंदे, नगराध्यक्ष, महाबळेश्वर व नवनियुक्त उपाध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र महासंघ