
शेंडगे म्हणाले, “यापूर्वी मी कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांची कार्यपद्धती आणि सुरू असलेला भ्रष्टाचार सभासद व कामगारांसमोर मांडला होता. मात्र त्यावेळी सभासद आणि कामगारांनी मला पाठिंबा न देता सत्ताधाऱ्यांवर विश्वास ठेवला. परिणामी आज कारखाना बंद पडण्याची वेळ आली आहे. कारखाना वाचविण्यासाठी मी संघर्षाची भूमिका घेतली होती; मात्र अपेक्षित पाठबळ मिळाले नाही. आता तालुक्याची जीवनवाहिनीच बंद पडल्याने बाजारपेठ ओस पडली आहे. ऊसतोड मजूर, कामगार, वाहतूकदार आणि व्यापारी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आपली नेमकी चूक कुठे झाली, याची जाणीव आता सर्वांना झाली आहे. कारखाना वाचविण्यासाठी आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना दूर करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने व ताकदीने कामाला लागावे.”
यावेळी बोलताना संदीप आबा गिड्डे पाटील म्हणाले, “महांकाली साखर कारखाना हा केवळ एक उद्योग नसून हजारो शेतकरी, कामगार, वाहतूकदार आणि व्यापाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा आधार आहे. कारखाना बंद पडल्यामुळे तालुक्याच्या अर्थचक्रावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून कारखाना पुन्हा उभा करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत. आगामी निवडणुकीत सभासदांचा विश्वास संपादन करून कारखान्याला सक्षम नेतृत्व देण्याचा निर्धार आपण केला पाहिजे.”
बैठकीस मिलिंद बापू कोरे, समाजकल्याण सभापती दादासाहेब कोळेकर, जिल्हा परिषद सदस्य संजय बनसोडे, जिल्हा परिषद सदस्य विकास हक्के, माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन कोठावळे, पंचायत समितीचे उपसभापती वामन कदम, मार्केट कमिटीचे माजी सभापती महेश पवार, नेताजी पाटील, काँग्रेस नेते प्रा. दादासाहेब ढेरे, अविराजे शिंदे, आप्पासाहेब कोळेकर, तुकाराम पाटील, दिलीप झुरे, आप्पासाहेब सगरे, संजय शेटे, रणजीत घाडगे, विक्रम कोळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आगामी निवडणुकीत महांकाली साखर कारखान्यावर परिवर्तन घडवून आणण्यासाठी संघटितपणे काम करण्याचे आवाहनही गिड्डे पाटील यांनी केले.
दरम्यान, या बैठकीला आमदार रोहित पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने कृती समितीची ताकद वाढल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आमदार विनय कोरे यांच्या नेतृत्वाखालील जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर रोहित पाटील समर्थकांनी कारखाना बचाव कृती समितीला जाहीर पाठिंबा दिल्याने तालुक्याच्या सहकार आणि राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
भाजपमधून निलंबित झाल्यानंतर संदीप आबा गिड्डे पाटील यांनी तालुक्यातील सामाजिक, सहकारी आणि राजकीय प्रश्नांवर अधिक सक्रिय भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. महांकाली साखर कारखाना बचाव कृती समितीच्या माध्यमातून कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा प्रयत्न त्यांनी हाती घेतला असून, सभासद व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन संघटनबांधणीवर भर दिला जात आहे. नांगोळे येथील बैठकीतही त्यांनी सर्वपक्षीय एकजुटीचे आवाहन केले. त्यामुळे आगामी काळात तालुक्याच्या सहकार आणि राजकारणातील त्यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष लागले आहे.
अनधिकृत हॉटेल्सवर एसटी बस थांबवणे चालकांना पडलं महागात; थेट पगारातून वसूल होणार दंड