महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करणे 22 ऑक्टोबरपासून सुरु झाले आहे. 288 मतदारसंघात निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज तिसरा दिवस होता. 24 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजे आजपर्यंत 552 उमेदवारांचे 720 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. आज अनेक मातब्बर नेते मंडळींनी राज्यात अर्ज भरले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची 15 ऑक्टोबर 2024 रोजी घोषणा करण्यात आली. त्यानंतर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मंगळवार 22 ऑक्टोबर 2024 पासून नामनिर्देशन पत्र भरणे सुरु असून 29 ऑक्टोबरला नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे. या अर्जाची 30 ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन 4 नोव्हेंबर 2024 रोजी उमेदवाराला अर्ज मागे घेता येऊ शकतो. राज्यातील मतदान एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला पार पडणार आहे. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.
ईव्हीएम मशिन्स बदलही देण्यात आली माहिती.
15 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभेची घोषणा केली. त्या दिवसापासून राज्यात आचारसंहिता ही लागू झाली. मंगळवार 22 ऑक्टोबर 2024 पासून उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी सुरु झाला आहे. आज असंख्य उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज भरण्याची कालावधी ही 29 ऑक्टोबरपर्यंत आहे. दरम्यान विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने राज्यात पूरेशा ईव्हीएम मशिन्स उपलब्ध आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आलेल्या माहितीमध्ये असे म्हटले आहे की, “महाराष्ट्राच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पुरेशा संख्येने ईव्हीएम मशिन्स उपलब्ध आहेत. सर्व बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व ईव्हीएम मशिन्सची प्रथम सरमिसळ 18 ते 21 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत सर्व जिल्ह्यांकडून पूर्ण करण्यात आली आहे.
मतदान केंद्र ईव्हीएम मशिन्स
महाराष्ट्रातील विधानसभा 2024 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने 1 लाख 186 इतके मतदान केंद्र आहेत. या केंद्राकरिता 2 लाख 21 हजार 600 बॅलेट युनिट (221 %) 1 लाख 21 हजार 886 कंट्रोल युनिट (122%) व 1 लाख 32 हजार 94 व्हीव्हीपॅट (132%) इतक्या प्रथमस्तरीय तपासणी मशिन्स उपलब्ध आहेत. एकूण प्रथमस्तरीय करण्यात आलेल्या ईव्हीएम मशिन्स पैकी प्रशिक्षण व जनजागृतीच्या कार्यक्रमाकरिता त्यापैकी 5 हजार 166 बॅलेट युनिट, 5 हजार 166 कंट्रोल युनिट व 5 हजार 165 व्हीव्हीपॅट इतक्या ईव्हीएम मशिन्सचा वापर करण्यात आला आहे.