फोटो - टीम नवराष्ट्र
मुंबई : सध्या बदलापूर अत्याचार प्रकरणामुळे राज्यामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. शाळेत अवघ्या 4 वर्षांच्या मुलीवर सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्यामुळे राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. हे प्रकरण सध्या हाय कोर्टामध्ये सुरु असून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जनसमुदायातून होत आहे. याच घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी रस्त्यांवर उतरले आहे. पहिल्यांदाच महाविकास आघाडीचे सर्व नेते राज्यभरामध्ये मूक मोर्चा आणि आंदोलन करणार आहे. या आंदोलनामध्ये जेष्ठ नेते शरद पवार हे देखील सामील झाले आहे. तोंडाला काळे मास्क लावून शरद पवारांनी अत्याचार प्रकरणाचा निषेध दर्शवला होता.
बदलापूर अत्याचार प्रकरणामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. राज्यामध्ये लाडकी बहीण नाही तर सुरक्षित बहीण हवी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. आज (दि.24) दुपारी 2 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंदची हाक विरोधकांकडून देण्यात आली होती. मात्र हायकोर्टाने फटकारल्यानंतर मविआने महाराष्ट्र बंद मागे घेतला. मात्र राज्यभरातून महाविकास आघाडीचे सर्व नेते मुक मोर्चा काढणार आहे. त्याचबरोबर या अत्याचाराच्या वाईट प्रवृत्तीविरोधात काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला जात आहे.
उद्धव ठाकरे यांचे आंदोलन
मुंबईतील शिवसेना भवनच्या बाहेर शिवसेना ठाकरे गटाकडून मुक आंदोलन केले जात आहे. बदलापूर अत्याचाराच्या विरोधात भूमिका मांडण्यासाठी शांततापूर्वक हे आंदोलन ठाकरे गट करणार आहे. ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील आंदोलनामध्ये सामील होणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी काळ्या रिबीन बांधून या घटनेचा आणि सरकारचा निषेध करणार आहेत. या आंदोलनासाठी शिवसेना भवन परिसरात काळ्या रंगाचा स्टेज देखील बांधण्यात आला आहे. तसेच शिवसेना भवनाबाहेर मोठे पोस्टर लावण्यात आले आहेत.
हे देखील वाचा : महाविकास आघाडीचे मुक आंदोलन; भाजप देणार आंदोलनाने प्रत्युत्तर
शरद पवार यांचे आंदोलन
शरद पवार गटाचे पुण्यामध्ये आंदोलन असणार आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पुण्यात आंदोलन केले जात आहे. काळ्या फिती बांधून बदलापूर अत्याचार प्रकरणाचा तीव्र निषेध दर्शवला जात आहे. पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बसून हे आंदोलन सुरु आहे. यावेळी तोंडावर काळी पट्टी आणि काळे झेंडे घेऊन मूक आंदोलन सुरु आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे व जेष्ठ नेते शरद पवार आंदोलनामध्ये सामील झाले आहेत. शरद पवार यांनी तोंडाला काळे मास्क लावले आहे.
📍पुणे ⏭️ 24-08-2024
➡️ राज्यातील लैंगिक अत्याचार घटनांच्या विरोधात पुणे येथे आयोजित मूक आंदोलन – लाईव्ह
https://t.co/xS0XabaJ9M— Supriya Sule (@supriya_sule) August 24, 2024
कॉंग्रेसकडून अत्याचाराचा तीव्र निषेध
महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या कॉंग्रेसचे देखील राज्यभरामध्ये आंदोलन असणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वामध्ये ठाण्यात मूक आंदोलन केले जाणार आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे इतर सर्व नेते आणि कार्यकर्ते देखील काळ्या पट्ट्या बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन निषेध व्यक्त करणार आहे. त्यामुळे बदलापूर प्रकरणाच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीमधील सर्व प्रमुख नेते रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसणार आहेत.