
Maharashtra Breaking News Updates Today:
Maharashtra to World Breaking News: आज काय घडतंय? कुठे काय झालं? राजकीय उलथापालथीपासून ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत, सर्व ताज्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स फक्त येथे
आतापर्यंत, इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) या हंगामात 15 सामने खेळले गेले आहेत. दरम्यान, अजूनही असे दोन संघ आहेत ज्यांना आपला पहिला विजय मिळवता आलेला नाही. गुरुवारी खेळल्या गेलेल्या एका महत्त्वपूर्ण सामन्यात, लखनौ सुपर जायंट्सने आणखी एका विजयाची नोंद केली; दुसरीकडे, KKR ने गुणतालिकेवर आपले खाते उघडले असले तरी, या संघाला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, गुणतालिकेतील क्रमवारीतही बदल दिसून येत आहेत.
10 Apr 2026 05:55 PM (IST)
काँग्रेस पक्षाच्या “संघटन सृजन अभियान” अंतर्गत उल्हासनगर जिल्ह्यात संघटन मजबुतीसाठी व्यापक हालचाली सुरू असून, या अभियानाला गती देण्यासाठी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या नियुक्त निरीक्षक डॉ. पलक वर्मा यांनी उल्हासनगर मध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेत संवाद साधला. बूथस्तरावर पक्षाची मजबूत बांधणी करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच प्रत्येक बूथवर सक्रिय कार्यकर्त्यांची टीम उभी करून पक्षाची उपस्थिती तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले. संघटन सृजन अभियानाद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधून जिल्हाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया केली जाणार असल्याचे डॉ. पलक वर्मा यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी निरीक्षक अस्लम शेख, बाबू नायर, अनिस इद्रिसी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उल्हासनगर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे, नगरसेविका अंजली साळवे, शंकर आहुजा, किशोर धडके, विशाल सोनवणे, सामवेल मावची, रविकांत आपटे, नानिक आहुजा, मनीषा महाकाले, रोहित आव्हाल आदी मान्यवर उपस्थित होते.
10 Apr 2026 05:50 PM (IST)
उल्हासनगर शहरात CBI अधिकारी बनून सुशिक्षित तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये ठकवणाऱ्या एका भामट्याला विठ्ठलवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा भामटा कमरेला नकली पिस्तूल लटकवून आणि CBI चा बॅच दाखवत फिरायचा. या बनावट अधिकाऱ्याचा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना संशय आणि त्यांच्या सतर्कतेमुळे या आरोपीला पकडण्यात यश आले. हा संशयित उल्हासनगरमध्ये CBI अधिकारी बनून फिरत होता. तो स्वतःला उच्च पदावर असल्याचे सांगून लोकांना CBI मध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत होता. अनेक लोक त्याच्या बोलण्याला भुलले आणि त्याला लाखो रुपये दिले.
10 Apr 2026 05:40 PM (IST)
ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला हा कचराळी तलाव परिसरात रोज हजारो नागरिक इथे फिरायला येतात. पण इथल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था पाहिली तर चित्र खूपच धक्कादायक आहे. पाण्याची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारायला येणाऱ्या नागरिकांसाठी ही मोठी समस्या बनली आहे. यातच भर म्हणजे इथे विद्युत व्यवस्थेचाही पूर्ण अभाव आहे. विशेष म्हणजे २०१७ सालीही त्यांनी याच समस्येकडे लक्ष वेधले होते. काही कामे झाली पण स्वच्छतागृहांची समस्या आजही तशीच आहे.
10 Apr 2026 05:35 PM (IST)
नाशिकमधील एका नामांकित कार्पोरेट कंपनीत 'लव्ह जिहाद'चे धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी 'कार्पोरेट जिहाद' ही नवीन आणि घातक संकल्पना समोर आणली आहे.
10 Apr 2026 05:30 PM (IST)
सिंधुदुर्गातील समुद्रकिनाऱ्यामध्ये होणाऱ्या अनाधिकृत मासेमारी आणि एलईडी द्वारे होणारी मासेमारी यांच्या विरोधात आज ठाकरे शिवसेनेतर्फे मालवण मत्स्य विभाग कार्यालयावर धडक दिली. या मोर्चामध्ये मालवण वेंगुर्ला देवगड या भागातील स्थानिक मच्छीमार बांधव सहभागी झाले होते. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रात होणाऱ्या एलईडी मासेमारीवर तात्काळ ठोस कारवाई करावी अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली. तसेच येत्या काळात यावर कारवाई न झाल्यास याही पेक्षा मोठे आंदोलन उग्र स्वरूपात छेडण्यात येईल असा इशारा ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.
10 Apr 2026 05:25 PM (IST)
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी केलेले कार्य आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांच्या जोरावर अक्षय कर्डिले हे ४ मे रोजी आमदार झालेले दिसतील," असा ठाम विश्वास भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. अहिल्यानगर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी निवडणूक आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केले.
10 Apr 2026 05:20 PM (IST)
माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस आज साजरा होत असून त्यानिमित्त प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी नारायण राणे यांचे वाळूशिल्प साकारले आहे.
10 Apr 2026 05:15 PM (IST)
जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि विशेषतः कायदेशीर क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने असोसिएट पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे एकूण २८ पदे भरली जातील. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असेल आणि ती १६ एप्रिलपासून सुरू होईल. इच्छुक उमेदवार ३० एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात.
10 Apr 2026 05:10 PM (IST)
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेला तमाशा सध्या अस्तित्वाच्या उंबरठ्यावर उभा आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात वाढत्या हुल्लडबाजीमुळे आणि बदलत्या प्रेक्षकवृत्तीमुळे या लोककलेचे मूळ स्वरूप धूसर होत चालल्याची खंत कलावंत व्यक्त करत आहेत. तमाशा म्हणजे केवळ गाण्यांचा कार्यक्रम नसून गण, गवळण, बतावणी, वगनाट्य अशा विविध घटकांनी समृद्ध असलेली एक सशक्त लोकपरंपरा आहे.या माध्यमातून समाजप्रबोधन, विनोद आणि लोकजीवनाचे वास्तव प्रभावीपणे मांडले जाते, मात्र सध्या अनेक ठिकाणी गाणे लावा अशा मागण्यांनी कार्यक्रमाची दिशा बदलून टाकली आहे. परिणामी, संपूर्ण तमाशा केवळ ऑर्केस्ट्रापर्यंत मर्यादित राहत आहे. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे काही ठिकाणी कलावंतांशी असभ्य वर्तनाचे प्रकार वाढले आहेत. महिलांवर दगडफेक, अश्लील टिप्पणी, लेझर लाइंटचा त्रास तसेच कपडे बदलण्याच्या ठिकाणी डोकावण्यासारख्या घटना समोर येत आहेत. या प्रकारांमुळे महिला कलावंतांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या सन्मानालाही तडा जात आहे.
10 Apr 2026 05:05 PM (IST)
उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रेक्षकांना हसवणारा नवीन मराठी चित्रपट Picture Boys लवकरच भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.हा चित्रपट १५ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हिरो होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या दोन तरुणांची मजेशीर आणि धमाल गोष्ट दाखवण्यात आली आहे. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठीची धडपड, कॉमेडी आणि घडणाऱ्या गंमतीजमती या चित्रपटात पाहायला मिळतील.
10 Apr 2026 04:55 PM (IST)
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल डिझेल आणि गॅस पुरवठ्यावर त्याचा परिणाम जाणवत आहे आणि याचाच फायदा घेत काही जण पेट्रोल आणि डिझेल काळाबाजार करत आहे.अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी येथे अन्न व नागरी पुरवठा विभागाने पेट्रोल डिझेलची साठवणूक करणाऱ्या एका गोदामावर छापेमारी केली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत 800 लिटर डिझेल तर दहा लिटर पेट्रोल असा साठा त्यांनी जप्त केला आहे. ही कारवाई अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई आहे.
10 Apr 2026 04:50 PM (IST)
रोख रकमेच्या घोटाळ्यात अडकलेले अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर केला आहे. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जळालेली रोकड सापडल्याच्या वादामुळे त्यांची अलाहाबाद येथे बदली करण्यात आली होती. त्यांनी ५ एप्रिल २०२५ रोजी शपथ घेतली होती आणि सध्या त्यांच्यावरील आरोपांच्या अंतर्गत चौकशीसंदर्भात त्यांच्यावर खटला सुरू आहे.
10 Apr 2026 04:40 PM (IST)
राज्यातील पहिली वातानुकुलित जिल्हा परिषद शाळा सिंधुदुर्गातील वारंगावमध्ये सुरु करण्यात आली आहे. त्याचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. कणकवली तालुक्यातील वारगाव जिल्हा परिषद शाळा नं ३ ही पहिली ते सातवीपर्यत आहे. या प्रत्येक शाळेच्या वर्गामध्ये सरपंच यांच्या माध्यमातून एसी (वातानुकुलीत) बसविण्यात आला आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना एसीमध्ये बसून आनंद घेत शिक्षण घेता येणार आहे. खडसे नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या गावातील ग्रामस्थांनी या जिल्हा परिषद शाळेला अनोख गिप्ट दिलेलं पाहायला मिळतंय.
10 Apr 2026 04:35 PM (IST)
मिरा रोड येथील रामदेव पार्क परिसरात सुरू असलेल्या महापालिकेच्या जलवाहिनी अंथरणीच्या कामाचा व्हिडिओ करत असताना मनसे पदाधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मिरा रोड पोलिसांनी मुख्य आरोपी नवीन सिंग ठाकूर याच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे मुख्य आरोपी आणि त्याचे साथीदार हे शिवसेनेचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.
10 Apr 2026 04:30 PM (IST)
मुंबई गोवा महामार्गवर चिपळूण येथील डी बी जे कॉलेजमोर उड्डाण पुलाचे काम सुरू असल्यामुळे लावण्यात आलेल्या पत्र्याच्या भिंतीला धडक देऊन एक रिक्षा जागीच पलटी झाली . या अपघातात रिक्षा चालक जखमी झाला. मुख्य रस्त्यावरच रिक्षा पलटी झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती यावेळी स्थानिक नागरिक मदतीला धावले आणि रिक्षा चालकाला गाडीतून बाहेर काढून वाहतूक सुरळीत केली.
10 Apr 2026 04:25 PM (IST)
मुंबईजवळील घारापुरी (एलिफंटा) बेट येथील मोराबंदर परिसरात सुरू असलेल्या उत्खननात महत्त्वपूर्ण पुरातत्त्वीय अवशेष सापडले आहेत. यात सुमारे १.२५ मीटर उंचीचे महाकाय साठवणूक रांजण आणि मोठ्या व्यासाचे तुटलेले जार आढळले असून, त्यांचा वापर पाणी साठवण्यासाठी होत असावा, असा अंदाज आहे.उत्खननात रोमन ॲम्फोरा, पश्चिम आशियातील जार, चिनी पोर्सिलेन यांसारखे अवशेष सापडल्याने चौथ्या-पाचव्या शतकात या बेटाचा आंतरराष्ट्रीय व्यापाराशी थेट संबंध होता, हे स्पष्ट झाले आहे. तसेच विटांनी बांधलेली पाण्याची टाकी सापडल्याने त्या काळातील प्रगत जलव्यवस्थापनाची साक्ष मिळाली आहे. या संशोधनामुळे घारापुरी बेट केवळ धार्मिक स्थळ नसून प्राचीन काळातील एक समृद्ध व्यापारी केंद्र होते, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
10 Apr 2026 04:20 PM (IST)
भारतीय जनता पक्षाने पोटनिवडणुकीची परंपरा मोडली. राहुरीची आणि बारामतीच्या निवडणुकीत फरक आहे, त्यात तुलना करू नका. भाजपने सुशिक्षितपणा आणि सभ्यपणा निवडणुकीत कधी दाखवला नाही. ऑपरेशन एकदाच केला जातो. वारंवार शरीराचे ऑपरेशन करतात, ते डेड बॉडीचं करतात. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे ऑपरेशन करतात.विरोधी पक्षाच्या खासदारांना, आमदारांना महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी दिला जात नाही. सत्ताधाऱ्यांना कोटी-कोटींचा निधी दिला जातो, असा टोला संजय राऊत यांनी केला आहे.
10 Apr 2026 04:15 PM (IST)
डोंबिवलीच्या सरला नगरमध्ये 7 इमारतींना KDMC कडून अतिधोकादायक नोटीस; रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण. चेअरमनवर विश्वासात न घेता स्ट्रक्चरल ऑडिट केल्याचा आरोप, तर भाजप आक्रमक होत कारवाईची मागणी केली आहे.
10 Apr 2026 04:10 PM (IST)
वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून ‘टीबी मुक्त भारत’ अभियानांतर्गत गेल्या १०० दिवसांत तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेत आतापर्यंत २ लाखांहून अधिक नागरिकांचे स्क्रीनिंग करण्यात आले असून ८० हजार ते १ लाख एक्स-रे तपासण्या करण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे संशयित रुग्णांचे लवकर निदान होऊन ६ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. यापैकी सुमारे ५० टक्के रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून सध्या सुमारे ३,५०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाकडून नागरिकांना टीबीची लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
10 Apr 2026 04:05 PM (IST)
कर्जत तालुक्यातील पाषाणे ग्रामपंचायत मधील आर्डे गावातील सध्याची नळपाणी योजना बंद पडली आहे.तर नवीन नळपाणी योजनेचे काम सुरू असून गेली तीन वर्षे सुरू आहे.त्यामुळे आर्डे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.ग्रामस्थांना ग्रामपंचायत कडून पाषाणे धरणातून उचलले जाणारे पाणी दिवसाआड सोडले जात आहे.मात्र ते पाणी दररोज मिळावे आणि सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात किमान अर्धा तास पाणी मिळावे अशी मागणी महिलांनी केली आहे.
10 Apr 2026 03:35 PM (IST)
आगामी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सूचक विधान केले आहे. "मी बारामतीला मतदार म्हणून जाणार आहे, मात्र अजितदादांच्या पक्षाने विचारले तर मी प्रचाराला जाईन," असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. रिश्ते मायने रखते है असं त्यांनी म्हटलं.
10 Apr 2026 03:23 PM (IST)
"माझा ना कोणाशी संपर्क, ना कोणी मला संपर्क केलाय. मी आजही आणि उद्याही शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खासदार म्हणून काम करत राहील" अशी प्रतिक्रिया खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिली आहे. ऑपरेशन टायगर बाबत ते बोलत होते.
10 Apr 2026 03:14 PM (IST)
नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. शहर बससेवेतील 'आपली बस' प्रकल्पासाठी नेमण्यात आलेल्या तीन ऑपरेटर्सविरोधात आता पोलिसात गुन्हे दाखल करण्याचा निर्णय परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
10 Apr 2026 03:05 PM (IST)
केरळमधील पालक्काड येथील १५ वर्षीय मुलगी श्रीनंदा, काल रात्री आपल्या पालकांसह चिक्कमगलूर येथे दाखल झाली. सायंकाळी साधारण ५:३० वाजता त्यांनी लोकप्रिय 'माणिक्यधारा धबधब्या'ला भेट दिली; तिथे असतानाच तिच्या पालकांच्या लक्षात आले की ती बेपत्ता झाली आहे. पोलीस आणि वनविभागाकडीन शोध सुरु आहे.
10 Apr 2026 02:59 PM (IST)
10 Apr 2026 02:55 PM (IST)
लोणावळ्यातील भुशी धरण परिसरात प्रशासनाने काल अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली. या कारवाईमुळे सुमारे १५० छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी उपोषण सुरू करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
10 Apr 2026 02:48 PM (IST)
सिंधुदुर्गातील समुद्रकिनाऱ्यावर होणाऱ्या अनाधिकृत एलईडी मासेमारीच्या विरोधात मालवणात पारंपारिक मच्छीमार रस्त्यावर उतरले आहेत. ठाकरे शिवसेनेतर्फे मालवण मत्स्य विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला असून मालवण, वेंगुर्ला, देवगड या भागातील स्थानिक मच्छीमार बांधव या मोर्चात सहभागी झाले आहेत.
10 Apr 2026 02:42 PM (IST)
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या सीमेवरून वाहणाऱ्या मुठा नदीच्या पात्रात आज दुपारी सुमारे सहा वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. खडकी आणि दापोडी दरम्यान असलेल्या हॅरिस ब्रिजजवळ हा अनोळखी मुलीचा मृतदेह पोलिसांच्या निदर्शनास आला असून, पुढील तपास सुरू आहे.
10 Apr 2026 02:39 PM (IST)
नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत कथित धर्मांतर प्रकरण उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीच्या वर्तणुकीत गेल्या दोन वर्षांत लक्षणीय बदल झाल्याचे समोर आले असून ती सलग महिनाभर उपवास करत होती, तसेच हिंदू मैत्रिणींसोबत जेवणास नकार देत होती. गेल्या वर्षापासून तिने सौंदर्यप्रसाधनांचा वापरही पूर्णपणे बंद केल्याची माहिती मिळते. संशयित दानिश विवाहित असल्याचे सांगितले जात असतानाही पीडितेला त्यावर विश्वास बसला नाही.
10 Apr 2026 02:30 PM (IST)
कोल्हापुरात थकीत बिलांच्या वसुलीसाठी कंत्राटदार आक्रमक झाले असून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आमच्या प्रलंबित बिलांची तात्काळ वसुली केल्याशिवाय नवीन निविदा काढू नयेत, अशी ठाम मागणी कंत्राटदारांनी केली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही देयके न मिळाल्याने संतप्त झालेल्या कंत्राटदारांनी हा मार्ग अवलंबला असून प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
10 Apr 2026 02:19 PM (IST)
10 Apr 2026 02:11 PM (IST)
नाशिकमधील IT क्षेत्रात महिलांच्या शोषणाच्या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. घटनेची सविस्तर माहिती अद्याप नसल्याचे त्यांनी सांगितले, मात्र संबंधित प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.
10 Apr 2026 02:03 PM (IST)
नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय IT कंपनीत विशिष्ट धर्माच्या कर्मचाऱ्यांकडून हिंदू मुली व महिलांचे लैगिंक शोषण व धर्मातराचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ८ मुलींनी पुढे येत तक्रार दिली. ९ गुन्हे दाखल झाले आहेत. भाजप युवा मोर्चाने याविरोधात निषेध नोंदवला. संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी नाशिकच्या IT कंपनीचं गेट तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला.
10 Apr 2026 02:02 PM (IST)
शोरूमची बनावट पावती देऊन आणि विनापरवाना रिक्षा देऊन एका चालकाची एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना १० फेब्रुवारी २०२५ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान वाकड येथील रिदम ऑटो विनोदे वस्ती येथे घडली. याबाबत विकास अभिमन्यू वाघमारे (४३, थेरगाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार किशोर उर्फ सचिन सुधाकर बागडे (लोहगाव, पुणे, मूळ - भिमा कोरेगाव, ता. शिरूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला नवीन अल्टो रिक्षा देतो असे सांगून बुकिंगचे ५ हजार आणि रोख १ लाख रुपये घेतले. त्यानंतर कोणतीही कागदपत्रे, विमा किंवा पासिंग नसलेली रिक्षा देऊन फिर्यादीची फसवणूक केली. फिर्यादीने आक्षेप घेतला असता आरोपीने रिक्षा शोरूमला जमा करून घेतली, मात्र पैसे परत न देता विश्वासघात करत फिर्यादी आणि शोरूम ची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
10 Apr 2026 01:45 PM (IST)
औद्योगिक नगरीतील कायदा आणि सुव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस दल आता अधिक सुसज्ज झाले आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पोलीस दलात ८ नवीन ‘स्कॉर्पिओ एन’ चारचाकी आणि ४२ ‘होंडा ॲक्टिव्हा’ दुचाकी वाहनांचा ताफा नव्याने सामील झाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या या वाहनांमुळे पोलिसांची गस्त आणि गुन्हेगारांचा पाठलाग आता अधिक प्रभावीपणे होणार आहे.
10 Apr 2026 01:30 PM (IST)
कामशेत येथील एका दुकानात महिलेला कपडे बदलण्यासाठी पाठवून तिचे गुप्त चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १६ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० ते ३.०० वाजण्याच्या दरम्यान कामशेत येथील “मुकेश फॅन्सी कॉर्नर” या दुकानात हा प्रकार घडला. दुकानाचे मालक मुकेश मुथा (रा. कामशेत, ता. मावळ, जि. पुणे) यांनी पीडित महिलेला दुकानाच्या स्टोअर रूममध्ये कपडे बदलण्यासाठी पाठवले. स्टोअर रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असल्याची जाणीव असूनही आरोपीने महिलेला कपडे बदलताना जाणीवपूर्वक चित्रीकरण केले. यामुळे पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग करण्यात आला. तसेच पीडितेला दमदाटी केल्याचाही आरोप आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार लोसरवर करत असून, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे. दरम्यान, आरोपी मुकेश मुथा याला अटक करून आज वडगाव मावळ येथील न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
10 Apr 2026 01:15 PM (IST)
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणी तुंबणे व पूरस्थिती टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याच्या सुचना स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी केल्या. नगरसेविका रूपाली धाडवे यांनी या संदर्भातला प्रस्ताव दिला होता. शहरात गेल्या काही काळात अल्पावधीत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना वाढल्या आहेत. नाल्यांमध्ये साचलेला गाळ, कमी झालेली वहन क्षमता आणि उंच भागातून सखल भागाकडे वाहून येणारे पाणी यामुळे समस्या अधिक गंभीर बनली आहे. यावर उपाय म्हणून सखल भागांतील प्रतिबंधात्मक कामे तातडीने हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत नाले व पावसाळी लाईनची तातडीने साफसफाई, साचलेला गाळ व पाणी काढणे, तसेच आवश्यक ठिकाणी मनुष्यबळ व यंत्रसामग्रीचा वापर करून कामे गतीने पूर्ण करण्यात येणार आहेत. यासाठी अनुभवी व गुणवत्तापूर्ण कंत्राटदारांची नियुक्ती करून कामे निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. सदर कामांसाठी तातडीने मंजुरी देण्यात आली असून, पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी ही उपाययोजना महत्त्वाची ठरणार असल्याचे भिमाले यांनी सांगितले. स्थायी समितीच्या या निर्णयामुळे पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई व जलनिस्सारण व्यवस्थेला गती मिळणार असून, संभाव्य पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार आहे.
10 Apr 2026 12:55 PM (IST)
भोंदूगिरी आणि अत्याचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तपास यंत्रणांनी खरातच्या काळ्या कारनाम्यांचे तब्बल १६० GB डिजिटल पुरावे गोळा केले असून, फॉरेन्सिक अहवाल सादर झाल्यानंतर तपासाला प्रचंड वेग आला आहे.
10 Apr 2026 12:50 PM (IST)
मुंबई-पुणे या दोन महानगरांच्या मध्यवर्ती तसेच पर्यटन व औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या मावळ तालुक्यात सध्या अवैध धंद्यांनी अक्षरशः थैमान घातल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस वाढणारे अवैध व्यवसाय पाहता संबंधित विभागांचे दुर्लक्ष आहे की जाणीवपूर्वक अभय दिले जात आहे, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
10 Apr 2026 12:40 PM (IST)
महापालिकेच्या विविध स्मशानभूमींमध्ये मृतदेहांचे दफन-दहन तसेच स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या कंत्राटी कामगारांनी स्मशान भूमीत तीव्र आंदोलन छेडलं आहे. गेल्या दोन महिन्यांचे वेतन थकल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (9 एप्रिल) मीरारोड येथील नवशा रूपा वावर मुक्तीधाम स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर या कामागारांनी ठेकेदार आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
10 Apr 2026 12:35 PM (IST)
वाढत्या प्रवासी गर्दीचा विचार करून पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी नवीन सहा प्लॅटफॉर्म बनवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला होता. आता या कामाला गती येताना दिसत आहे. पीएच-५३ अंतर्गत एकूण ४४ कोटी ९ लाख रुपयांच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली. यामुळे पुणे स्टेशनवर नव्या आयलंड प्लॅटफॉर्मसह आवश्यक सोयी-सुविधा उभारणीच्या कामाला गती येताना दिसून येत आहे.
10 Apr 2026 12:30 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून जागतिक तणावामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत होती. मात्र, आता गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलेने भारतीय बाजारावर आपला विश्वास कायम ठेवला आहे. मॉर्गन स्टॅनलेने भारतीय शेअर बाजारासाठी सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त केला करत स्पष्ट केलंय की सध्याची कमजोरी असूनही, BSE Sensex या वर्षी डिसेंबरपर्यंत सुमारे ९५,००० च्या पातळीवर पोहोचू शकतो. ही वाढ अंदाजे २४ टक्के इतकी दर्शवली जात आहे. यावरून असे सूचित होते की भविष्यात बाजारात लक्षणीय सुधारणा होऊ शकतं. पण ब्रोकरेजला इतका आत्मविश्वास का आहे. या बाबात सविस्तर जाणून घेऊयात.
10 Apr 2026 12:20 PM (IST)
भारतात निवडणुकीत ईव्हीएमचा वापर सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच निवडणुकीनंतरची तपासणी (ऑडिट) सुरू झाली आहे. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेशन यांनी ईव्हीएम तपासणीचे आदेश दिले आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आरिफ नसीम खान यांच्या उपस्थितीत ईव्हीएमची तपासणी करणार आहे. खान यांनी चांदिवली विधानसभा निवडणुकीच्या निकालांना आव्हान दिले आहे. खान हे शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्याकडून निवडणुकीत पराभूत झाले.
10 Apr 2026 12:14 PM (IST)
जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि विशेषतः कायदेशीर क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने असोसिएट पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे एकूण २८ पदे भरली जातील. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असेल आणि ती १६ एप्रिलपासून सुरू होईल. इच्छुक उमेदवार ३० एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात.
10 Apr 2026 12:10 PM (IST)
आयपीएल 2026 च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) तिसऱ्या पराभवाचा धक्का बसला आहे. लखनौच्या मुकुल चौधरीने खेळलेल्या वादळी खेळीमुळे केकेआरला पराभवाचे तोंड पाहावे लागले. मात्र, या सामन्यानंतर लखनौच्या विजयापेक्षा मैदानातील खराब अंपायरिंगचीच चर्चा रंगली आहे. केकेआरचा सलामीवीर फिन ॲलन याला बाद ठरवण्याच्या निर्णयावर आता चाहत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
10 Apr 2026 11:50 AM (IST)
शासनाकडून पिकांचे ५० टक्के नुकसान गृहीत धरून मदत जाहीर केली जात असताना, पीक विमा कंपन्यांनी नुकसानीची टक्केवारी अत्यल्प दाखवून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले आहे. तालुक्यातील साताळी येथील एका शेतकऱ्याला मका आणि सोयाबीनच्या नुकसानीपोटी विम्याच्या प्रीमियमपेक्षाही कमी भरपाई मिळाल्याने तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. तालुक्यातील साताळी येथील शेतकरी संदीप मच्छिंद्र कोकाटे यांनी ‘ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी’कडे मका पिकासाठी ३३४ रुपये आणि सोयाबीनसाठी ४०८ रुपये असा एकूण ७४२ रुपये प्रीमियम भरला होता.
10 Apr 2026 11:45 AM (IST)
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प आता बुलेट ट्रेनच्या वेगाने धावणार आहे. या प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक कामाला सुरुवात झाली आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ते शिलफाटा (सावळीजवळील घणसोली) पर्यंत २१ किलोमीटर लांबीचा भुयारी बोगदा बांधला जात आहे. या बोगद्याच्या १६ किलोमीटर भागासाठी टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) बसवण्याचे काम सुरू झाले आहे. पाण्याखाली बांधला जाणारा हा देशातील पहिला ७ किलोमीटर लांबीचा बोगदा असेल.
10 Apr 2026 11:40 AM (IST)
टेक कंपनी ओप्पोने चीनमध्ये एका नव्या स्मार्टफोनसह पुन्हा एकदा धमाका केला आहे. कंपनीने चीनमध्ये Oppo A6s Pro या नावाने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या अधिकृत लाँचिंगमध्ये कंपनीने डिव्हाईसच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केलेला नाही. मात्र डिव्हाईस अलीकडेच चायना टेलिकॉमच्या डेटाबेसमध्ये स्पॉट करण्यात आला होता. त्यामुळे या डिव्हाईसचे मुख्य स्पेसिफिकेशन्स आधीच समोर आले आहेत. Oppo A6s Pro मध्ये कोणते खास फीचर्स असणार आहेत आणि स्मार्टफोन किती व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे, याबाबत जाणून घेऊया.
10 Apr 2026 11:30 AM (IST)
राज्याच्या राजकीय वर्तुळातून पुन्हा एकदा भुकंपाचे संकेत मिळत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत हालचाली वाढल्यची माहिती समोर आली आहे. त्यांतर्गत बुधवारी रात्री ठाण्यात एक गुप्त बैठक पार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
10 Apr 2026 11:25 AM (IST)
भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे वारे वेगाने वाहत आहे. आज रस्त्यावर इलेक्टिक वाहनांच्या मागणीत सुद्धा वाढ झाली आहे. हीच मागणी लक्षात घेत अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी मार्केटमध्ये उत्तम ई बाईक ऑफर केल्या आहेत. नुकतेच रॉयल एन्फिल्डने देखील त्यांची पहिली इलेक्टिक बाईक बाजारात आणली आहे.