
टोमॅटो पिकाच्या दरात वाढ! उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; घाऊक बाजारात आवक वाढूनही वधारले भाव
सलग सहा महिन्यात आस्मानी संकटापुढे हतबल झालेल्या शेतकऱ्यांचे सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे अस्वस्थतेचे वातावरण आहे. या अशाच परिस्थितीत खोरीफाटा येथील उपबाजारातील खरेदी विक्री केंद्रावर टोमॅटो पिकाला तुलनात्मक दर वाढल्याने उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
खोरीफाटा येथील टोमॅटो खरेदी-विक्री केंद्रावर मंगळवारी (दि.११) २४,९३८ टोमॅटो जाळ्यांची (कॅरेट) आवक झाली. वीस किलोच्या जाळीला कमाल दर ७०१ रुपये, किमान ५१ रुपये तर सरासरी ४९१ रुपये अशा दराने व्यापाऱ्यांनी टोमॅटो खरेदी केला. दरम्यान, अतिवृष्टीचा फटका भुतकाळात उत्पादकांना बसला असून, टोमॅटोचे मोठे नुकसान झाले आहे. अस्मानी संकटातून वाचलेल्या शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकास चांगला दर मिळावा, अशी अपेक्षा आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
दरम्यान, दर्जेदार व प्रतवारी केलेल्या टोमॅटोला मागणी असून, त्याला चांगला दर मिळू शकतो, अशी शक्यता आहे. त्यामुळे प्रतवारीची प्रक्रिया उत्पादकांनी पार पाडावी, अशी सूचना दिडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, उपसभापती योगेश बर्डेव सचिव जे. के. जाधव यांनी केली आहे. दर्जेदार टोमॅटोचे प्रमाण अल्प असून, नुकसानग्रस्त व बाधित टोमॅटोचे पीक लक्षणीय असल्याने उत्पादकांना तुलनात्मक दिलासा नसला तरी आशादायक भविष्यकालीन दरवाढीच्या अंदाजामुळे त्यांच्यासाठी सकारात्मक बाब असल्याची माहिती प्रगतशील शेतकरी प्रकाश कड यांनी दिली आहे.
अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर घाऊक बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटली होती. मात्र आता ही आवक वाढली असल्याचं पाहायला मिळत आहे. तरी भाव स्थिर असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सव, नवरात्रात, पितृपक्ष यामुळे बाजारपेठेत भाजीपाल्याला मागणी वाढली होती. त्याचवेळी अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने भाजीपाल्याची आवक घटली होती. आता घाऊक बाजारपेठेत आवक वाढली असली तरी भाजीपाल्याचे दर मात्र खाली आलेले नाहीत. घाऊक बाजारपेठेत वांगी ७० ते ८० रुपये किलोने विकली जात आहे.
Maharashtra Local Body Elections 2025: निवडणूक आदर्श आचारसंहिता सुरु; काय करावे अन् काय करु नये?
शेपू ६० रुपये जुडी तर कांदापाती ५० रुपये, ढोबळी मिरची ६० ते ७० रुपये किलो, कारल्याला ६० ते ८० रुपयांचा भाव मिळतो आहे. गवार साधारण ७० ते ८० रुपये किलो, हिरवी मिरची ३० ते ४० रुपये, ढोबळी मिरची ६० ते ६० रुपये, भोपळा २८ ते ३० रुपये किलोने विकला जात आहे. पालेभाज्यांमध्ये शेपू ५० ते ६० रुपये जुडी, कांदा पात ३० ते ५० रुपये, मेथी ५० ते ६० रुपये याप्रमाणे भाव आहेत. दरम्यान, भाजीपाल्याची आवक वाढल्यानंतर तरी बाजारभाव कमी होतील, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना होती. मात्र, भाव स्थिर असल्याने सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ बसत असल्याचे दिसून येत आहे.