
एलॉन मस्क यांच्या वक्तव्यावर प्रताप सरनाईक आक्रमक! टेस्लाला दिलेल्या सवलतींचा फेरआढावा घेण्याचे संकेत
मुंबई : भारताचा स्वाभिमान, देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाची प्रतिष्ठा आणि लोकशाही संस्थांचा सन्मान यापेक्षा कोणतेही व्यावसायिक हित मोठे असू शकत नाही, असा ठाम संदेश महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिला आहे. टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांच्या ९ ऑक्टोबर रोजीच्या कथित सोशल मीडिया वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भारताच्या राष्ट्रीय प्रतिष्ठेचा मुद्दा अधोरेखित केला आहे.
स्टारलिंकच्या संदर्भात एलॉन मस्क यांनी केलेल्या कथित पोस्टमध्ये ‘Prime Minister Ambani’ असा उल्लेख झाल्याचे समोर आले आहे. या उल्लेखावर आक्षेप घेत सरनाईक यांनी अशा प्रकारची टिप्पणी खेदजनक असून, लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या भारताच्या नेतृत्वाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी असल्याची भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र देशाचे पंतप्रधान आणि सर्वोच्च घटनात्मक संस्थांचा सार्वजनिक अवमान सहन करणार नाही, असा स्पष्ट संदेशही या भूमिकेतून देण्यात आला आहे.
महाराष्ट्राने टेस्लासारख्या जागतिक कंपनीला मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. २०२५ मध्ये भारतात टेस्लाची २२६ वाहने विकली गेली, त्यापैकी १४० वाहने महाराष्ट्रात विकली गेली. म्हणजेच देशातील एकूण विक्रीमध्ये महाराष्ट्राचा वाटा सुमारे ६२ टक्के होता. २०२६ मध्ये आजपर्यंत भारतात टेस्लाची ८५९ वाहने नोंदणीकृत झाली असून, त्यापैकी २८२ वाहने महाराष्ट्रातील आहेत. त्यानुसार, देशातील एकूण नोंदणीमध्ये महाराष्ट्राचा वाटा सुमारे ३३ टक्के आहे. ही आकडेवारी महाराष्ट्राचे महत्त्वाचे बाजारपेठीय स्थान अधोरेखित करते. आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भारतात आणि महाराष्ट्रात व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत; मात्र या संधींचा आधार परस्पर सन्मान, विश्वास आणि जबाबदारी हाच असला पाहिजे, हा संदेश यातून देण्यात आला आहे.
आयात केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांना लागू असलेल्या शून्य टक्के रस्ते करसवलतीच्या मुद्द्यावरही या संदेशात महत्त्वपूर्ण भूमिका मांडण्यात आली आहे. अशा सवलतींचा कोणताही आढावा घेताना प्रस्थापित धोरणे, कायदेशीर तरतुदी, महाराष्ट्राचे हित आणि देशाचे व्यापक हित यांचा विचार केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यातून टेस्लाची सवलत तातडीने रद्द करण्याची घोषणा करण्यात आलेली नसली, तरी राज्याच्या हिताशी संबंधित धोरणांचा नियमानुसार पुनर्विचार करण्याचे संकेत मिळतात. कोणत्याही कंपनीला सवलती देताना राज्याचे आर्थिक हित आणि राष्ट्रीय प्रतिष्ठा यांच्यात समतोल राखणे आवश्यक असल्याचा या भूमिकेचा आशय आहे.
महाराष्ट्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला, सार्वजनिक वाहतुकीच्या विद्युतीकरणाला आणि पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. इलेक्ट्रिक बसेसचा विस्तार, चार्जिंग सुविधांची उभारणी आणि हरित वाहतुकीच्या पायाभूत सुविधांचा विकास यांना राज्यात महत्त्व दिले जात आहे. मात्र, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रीय स्वाभिमान जपणे या परस्परविरोधी बाबी नाहीत. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी भारताच्या बाजारपेठेत व्यवसाय करताना देशाच्या नेतृत्वाचा आणि संस्थांचा सन्मान राखणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
व्यापारामध्ये नफा आणि बाजारपेठ महत्त्वाची असली, तरी परस्पर आदर आणि विश्वासाशिवाय व्यावसायिक संबंध दीर्घकाळ टिकू शकत नाहीत. भारत जागतिक कंपन्यांसाठी खुला आहे; परंतु भारताच्या राष्ट्रीय स्वाभिमानाशी तडजोड करून कोणतेही व्यावसायिक हित साधले जाऊ शकत नाही, असा स्पष्ट संदेश मंत्री सरनाईक यांनी दिला आहे.