सौजन्य - नवराष्ट्र टीम
धाराशिव : अनाथ बालकांचे केवळ संगोपन न करता त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने महिला व बाल विकास विभागाने तीन अनाथ बालकांना ‘आपले सरकार’ केंद्र चालविण्याची संधी उपलब्ध करून दिली. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात या बालकांना मंजुरी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आहे. प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे यांच्या पुढाकारातून संबंधित बालकांच्या पुनर्वसनासाठी ही कार्यवाही करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत पीएम केअर्समधील कळंब येथील साक्षी शिंदे, तसेच बालगृहातील वाशी येथील आकाश जावळे आणि तुळजापूर येथील सिद्धिनाथ अनपट या तीन बालकांना ‘आपले सरकार’ केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयात केंद्र चालविण्यासाठी आवश्यक कक्षासह संपूर्ण किट त्यांना मोफत देण्यात आले आहे.
अनाथ बालकांच्या पुनर्वसनात निवारा, शिक्षण आणि संगोपनाबरोबरच पुढील आयुष्यात रोजगार व उत्पन्नाचे शाश्वत साधन उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. या उद्देशाने या तिन्ही बालकांना ‘आपले सरकार’ केंद्राच्या माध्यमातून रोजगाराची संधी देण्यात आली आहे. या केंद्रातून नागरिकांना विविध शासकीय आणि ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देताना संबंधित बालकांना उत्पन्नाचे साधनही मिळणार आहे. त्यामुळे शासनाच्या संरक्षणाखाली वाढलेल्या या बालकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची संधी मिळाली आहे. जिल्हा प्रशासन आणि महिला व बाल विकास विभागाच्या या उपक्रमामुळे अनाथ बालकांच्या पुनर्वसनाला रोजगाराची जोड मिळाली असून, त्यांना स्वावलंबी जीवनाची सुरुवात करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.






