दहावीचा आज निकाल (फोटो सौजन्य-X)
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (दि.13) जाहीर केला जाणार आहे. दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे. सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर ऑनलाईन निकाल जारी केले जातील.
महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून पत्रकार परिषदेत राज्याचा निकाल, मुलींचे आणि मुलांचे उत्तीर्ण प्रमाण, जिल्हानिहाय उत्तीर्ण आकडेवारी सांगितली जाईल. results.digilocker.gov.in, sscresult.mahahsscboard.in, sscresult.mkcl.org यासह अन्य माध्यमांच्या माध्यमातून तुम्ही निकाल जाणून घेऊ शकता.
10 दिवस आधीच परीक्षा
राज्य शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेली दहावीची परीक्षा यंदा 10 दिवस आधीच नियोजित करण्यात आली होती. यामुळे निकालही लवकर जाहीर होणार असल्याचे संकेत राज्य मंडळातर्फे देण्यात आले होते. त्यानुसार 15 मेपूर्वी निकाल जाहीर होणार असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले होते. आता निकाल जाहीर केले जाणार आहेत.
बारावीचा निकालही जाहीर
महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये कला शाखेचा एकूण उत्तीर्णतेचा टक्का ८०.५२% नोंदवला गेला आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यावर्षी कला शाखेचा निकाल थोडा कमी लागला आहे. मागील वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, २०२२ मध्ये ९०.५१%, २०२३ मध्ये ८४.०५% आणि २०२४ मध्ये ८५.८८% विद्यार्थी यशस्वी झाले होते. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की २०२५ मध्ये कला विद्याशाखेचा उत्तीर्ण होण्याचा टक्का गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत सर्वात कमी आहे.