महाविकास आघाडी एकसंघपणे लढणार; इचलकरंजी महानगरपालिकेत भक्कम पर्याय देणार (Photo : iStock)
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकसंघपणे सर्व ६५ जागांवर निवडणूक लढविणार आहे. या संदर्भात निश्चितपणे जनतेला सत्ताधाऱ्यांना भक्कम पर्यायी व्यापक आघाडी देण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष, संघटना प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीनंतर बावचकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
या बैठकीत प्रभागातील उमेदवारांचा सर्व्हे करण्यासाठी ६ प्रमुखांची समिती नियुक्त करण्यात आली. त्यामध्ये सयाजी चव्हाण, संजय कांबळे, प्रकाश मोरबाळे, उदयसिंग पाटील, सदा मलाबादे, हेमंत वणकुंद्रे यांचा समावेश आहे. तर कायदेशीर बाबींसाठी नियुक्त केलेल्या समितीत प्रकाश मोरबाळे, संजय कांबळे, उदयसिंग पाटील या तिघांचा समावेश असल्याचे बावचकर यांनी सांगितले.
कामकाजात सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप
बावचकर म्हणाले, महापालिकेतील कामकाजात सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप वाढला असून प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे. प्रशासनाला लोकप्रतिनिधींचा पाठींबा असल्याने नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे. पंचगंगा-कृष्णा नद्या दुथडी भरून वाहत असल्या तरी शहरात ८-८ दिवस पाणी पुरवठा होत नाही.
नागरिकांत असुरक्षिततेची भावना
शहराचा पाणी प्रश्न गंभीर बनत चालल असताना भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. स्वच्छता, रस्ते यासह अनेक प्रश्नांबाबत नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणेच समविचारी पक्ष, संघटनांना सोबत घेऊन महाविकास आघाडीतर्फे एकसंघपणे महापालिकेची निवडणुक लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बावचकर यांनी सांगितले.