Uddhav Thackeray Pune PC: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. भाजपप्रणित महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून स्थानिक पातळीवर तयारीही सुरू झाली आहे. यासगळ्यात गेल्या काही महिन्यांपासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. अशातच पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी निवडणुकांवर भाष्य केलं आहे.
२००५ पासून आम्ही वेगळे झालो. त्यानंतर जवळपास २० वर्षांनी एका मुद्द्यावर एकत्र आलो, आम्ही ५ जुलैला जो मेळावा घेतला, जर आम्हाला एकत्र यायचं नसतं तर आम्ही एकत्र आलोच नसतो. आताही आमच्या एक येण्यावरून विरोधकांचे धाबे दणाणलेत. मराठी माणूस एकवटल्यामुळे आपलं काय होणार, अशी भिती त्यांना वाटू लागली आहे.
महापालिका निवडणुका महाविकास आघाडीच्या म्हणून लढवणार की वेगवेगळ्या असा प्रश्न विचारण्यात आल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, हा प्रश्न तीनही पक्षांनी मिळून सोडवायचा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आम्ही आघाडी म्हणूल लढलो. आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्रपणे निवडणूक लढण्यात हरकत नाही. पण आमची आघाडी आहे, तीनही पक्षांना त्यांचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. जर तीनही पक्षांनी आघाडीतून लढावसं वाटलं तर आघाडीतून लढू अन्यथा वेगळं लढावसं वाटलं तर वेगळं लढू. ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील, त्यावेळी आम्ही हे ठरवू. स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील युनिटचा विचार करूनच पुढे निर्णय घेतला जाईल.
बाळासाहेब ठाकरे यांची बॉडी दोन दिवस का ठेवली, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला असता यावर बोलताना ते म्हणाले, “मी गद्दार आणि नमकहरामांना उत्तर देत नाही. ठाकरे कोण हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे गद्दार आणि हरामखोरांना उत्तर देत नाही,” असे सांगत त्यांनी रामदास कदम यांच्या आरोपांवर थेट भाष्य केले.
उद्धव ठाकरे यांनी वर्तमान सरकारवर निशाणा साधत म्हटले, “आताचं सरकार एका राजकीय पक्षासाठी काम करत आहे, देशासाठी नाही. तसेच मी वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सोनम वांगचूकला रासुका अंतर्गत अटक करून दडपशाही सुरू आहे. पण माध्यम म्हणून आपण खरंच हे दाखवतोय का? टीव्हीवर दाखवतोय का? त्या न्यायाने मला सांगा, तुम्हाला तरी मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे का?” असे थेट पत्रकारांना प्रश्न उपस्थित केले.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत रामदास कदम यांचे बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत केलेले विधान टाळून भाष्य केले. ते म्हणाले, “अशा गद्दारांवर मी बोलणार नाही. हो, अशा घाणेरड्या आरोपांमुळे वेदना होतात, पण ठिक आहे; गद्दारांना उत्तर देत बसत नाही,” असे सांगत त्यांनी या विषयाला फार महत्त्व दिले नाही.