मुंबई: महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर (Mahavitaran Strike) जाणार आहेत. खासगीकरणाला (Privatization) विरोध करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या ३० संघटनांनी आज रात्रीपासून ७२ तासांचा (3 Days Strike Of Mahavitaran Employees) म्हणजेच तीन दिवसांचा संप पुकारला आहे. तीन दिवसीय संपामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत तांत्रिक बिघाड झाल्यास, मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या संपकाळासाठी पुणे परिमंडल अंतर्गत आपत्कालीन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याद्वारे पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे तालुके व हवेली तालुक्यांमध्ये सर्वच ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी घेतली जात आहे. अशी माहिती महावितरणने दिली आहे.
दरम्यान, नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर २४ तास सज्ज आहे. काही तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा व संपाच्या कालावधीत सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
या संपाच्या पार्श्वभूमीवर पुणे परिमंडलामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून आपत्कालीन व्यवस्था उभारण्यास वेग आला आहे.महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल व संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनुसार पुणे परिमंडलस्तरावर कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये विविध उपाययोजनांसह विभाग, मंडल व परिमंडलस्तरावर २४ तास सुरू राहणारे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. दर तासाला वीजपुरवठ्याच्या स्थितीबाबत वरिष्ठ अधिकारी व मुख्यालयास कळविण्यात येणार आहे.
पर्यायी मनुष्यबळ
संपकाळात सुरळीत वीजपुरवठ्यास सर्वोच्च प्राथमिकता देण्यासाठी महावितरणकडून पर्यायी स्वरुपात मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत आहे. संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, बाह्य स्त्रोत कर्मचारी, महावितरणचे अप्रेंटिस, विद्युत सहायक, प्रशिक्षणार्थी अभियंता, देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या निवड सूचीवरील कंत्राटदारांचे कर्मचारी यांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. बाह्य स्त्रोत कंत्राटदारांना अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी करण्यात आली आहे. संपकाळामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी प्रत्येक विभागात निवडसूचीवर असलेल्या सर्व कंत्राटदारांना आवश्यक साधनसामुग्री, मनुष्यबळ व वाहनांसह संबधीत कार्यालयांमध्ये उपलब्ध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच महावितरणकडून वितरण रोहीत्र, ऑईल, वीजतारा, केबल्स, वीजखांब, फिडर पिलर्स, डिस्ट्रीब्यूशन बॉक्सेस, वाहतुकीसाठी वाहने आदी आवश्यक साधनसामुग्री महावितरणच्या विविध कार्यालयांमध्ये उपलब्ध ठेवण्यात आली आहे.






