लिफ्टमध्ये 'हायड्रोजन फुग्याचा' भीषण स्फोट; आगीच्या गोळ्यात अडकले तरुण-तरुणी (Photo Credit- X)
ही घटना २ फेब्रुवारी रोजी गोरेगाव (पश्चिम) येथील पेट्रोल पंपासमोर असलेल्या ‘अनमोल टॉवर’ या इमारतीत घडली. इमारतीमध्ये एका वाढदिवसाच्या पार्टीसाठी सजावटीचे काम सुरू होते. एक तरुणी लिफ्टमधून जात असताना, सजावटीचे काम करणारा तरुण हायड्रोजन गॅसचे फुगे घेऊन लिफ्टमध्ये शिरला. लिफ्टमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच हातातील फुगे अचानक मोठ्या स्फोटासह फुटले. फुगा फुटताच लिफ्टमध्ये आगीचा प्रचंड गोळा तयार झाला. स्फोट इतका भीषण होता की, क्षणात संपूर्ण लिफ्ट आगीने वेढली गेली. सुदैवाने, स्फोट झाला तेव्हा लिफ्टचा दरवाजा पूर्णपणे बंद झाला नव्हता. त्यामुळे आगीच्या ज्वाळांमध्ये असतानाच तिघांनीही तातडीने बाहेर झेप घेतली आणि स्वतःचे प्राण वाचवले.
सजावटीसाठी अनेकदा स्वस्त पर्याय म्हणून धोकादायक हायड्रोजनवायूचा वापर केला जातो, जो प्रत्यक्षात एका ‘फिरत्या बॉम्ब’सारखा असतो. हायड्रोजन हा वायू अत्यंत ज्वलनशील असतो. उष्णता, घर्षण किंवा विजेची एक छोटी ठिणगीही या वायूचा स्फोट घडवून आणण्यास पुरेशी असते. जेव्हा फुगा फुटतो, तेव्हा त्यातील हायड्रोजन त्वरित हवेतील ऑक्सिजनशी संयोग पावतो. यामुळे एक स्फोटक मिश्रण तयार होते आणि मोठा स्फोट घडून येतो. सिगारेट, पेटलेली मेणबत्ती किंवा लिफ्टमधील घर्षणामुळे निर्माण झालेली ठिणगीही हायड्रोजन फुगे फुटण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.
या धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून अशा प्रकारचे धोकादायक वायू वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.






