
‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल (फोटो सौजन्य-ChatGPT)
केडीएमसीतील राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना तपासे यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मनसेच्या नेत्यांनी पंतप्रधानांचा अवमान केल्याचे भाजपला खरोखरच वाटत असेल, तर केवळ नोटीस देऊन किंवा माध्यमांसमोर वक्तव्य करून थांबण्याऐवजी त्यांनी ठोस राजकीय भूमिका घ्यावी, असे तपासे म्हणाले.
KDMC News: तीन वर्षांपासून कोट्यवधींची देणी थकीत; ‘आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका’, ठेकेदारांचा आक्रोश
महेश तपासे म्हणाले, “खरंच भाजपला वाटत असेल की मनसेच्या नेत्यांनी पंतप्रधानांचा अवमान केला आहे, तर त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस देण्याची गरज नाही. त्यांनी थेट विरोधी पक्षात बसण्याची भूमिका घ्यावी. मात्र त्यासाठी नैतिक मूल्यांची गरज असते आणि ही नैतिक मूल्ये भाजपकडे राहिलेली नाहीत.” त्यांच्या या वक्तव्यामुळे केडीएमसीतील शिवसेना-भाजप वादाला आणखी राजकीय धार मिळण्याची शक्यता आहे.
तपासे यांनी पक्षांतराच्या मुद्द्यावरूनही भाजपला लक्ष्य केले. “दुसऱ्या पक्षातील आमदार, खासदार आणि नगरसेवकांना आपल्या पक्षात ओढून घेता आणि त्यानंतर नैतिकतेच्या गोष्टी करता,” अशी टीका त्यांनी केली. केवळ एक-दोन दिवस प्रसारमाध्यमांसमोर वक्तव्य करून पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला आपली भूमिका दाखवण्याचा प्रयत्न करू नका, असा टोलाही त्यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला लगावला.
केडीएमसीमध्ये शिवसेना आणि भाजपमधील वाद सुरू असतानाच महेश तपासे यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या नैतिकतेवर थेट प्रश्न उपस्थित करत त्यांनी पक्षाला विरोधी बाकावर बसण्याचे आव्हान दिल्याने आता भाजपकडून या टीकेला काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.