फुटपाथवर भंगार, हॉटेलच्या शेगड्या; कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण! कल्याण स्टेशन परिसरातील फुटपाथ नेमका नागरिकांसाठी की व्यावसायिकांसाठी?
कल्याण रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेवरील अत्यंत महत्त्वाचे आणि गर्दीचे स्थानक आहे. दररोज हजारो प्रवासी या स्थानकातून ये-जा करतात. सकाळी आणि सायंकाळी स्टेशन परिसरात मोठी गर्दी असते. अशा परिस्थितीत प्रवाशांसाठी फुटपाथ मोकळा असणे आवश्यक असताना प्रत्यक्षात स्टेशनसमोरील फुटपाथवर विविध प्रकारचे साहित्य ठेवण्यात आले आहे. काही ठिकाणी भंगाराच्या वस्तूंचे ढीग दिसत आहेत, तर हॉटेल व्यावसायिकांकडून शेगड्या व इतर साहित्य फुटपाथवर ठेवले जात आहे. परिणामी पादचाऱ्यांचा मार्ग अरुंद झाला असून अनेकांना थेट रस्त्यावरून चालावे लागत आहे.
KDMC News: १२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश! २७ गावांतील ५०० कर्मचाऱ्यांचा केडीएमसी सेवेत समावेश
स्टेशन परिसरात आधीच रिक्षा, बस आणि खासगी वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यात फुटपाथ अतिक्रमित झाल्यामुळे पादचारीही रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीचा ताण आणखी वाढत आहे. गर्दीच्या वेळेत या परिस्थितीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. स्टेशन परिसरातील विविध कामे आणि रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे प्रवाशांना आधीच समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप होत असताना आता फुटपाथवरील अतिक्रमणाने त्यात आणखी भर पडली आहे.
विशेष म्हणजे, फुटपाथ आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी केडीएमसीकडून यापूर्वीही कारवाया करण्यात आल्या आहेत. मे २०२६ मध्ये कल्याण रेल्वे स्थानक, स्कायवॉक आणि बाजार परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली होती. जून महिन्यातही महापालिकेने विविध भागांत कारवाई करत २७ हातगाड्या, अनधिकृत शेड आणि इतर अतिक्रमणे हटविल्याचे समोर आले होते. मात्र कारवाई झाल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा त्याच भागात अतिक्रमण होत असेल, तर या कारवाईचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. केवळ तात्पुरती कारवाई न करता संबंधित ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत.
महापालिकेची कारवाई झाल्यानंतरही पुन्हा फुटपाथवर व्यवसाय आणि साहित्य मांडण्याचे धाडस कसे केले जाते? अतिक्रमण करणाऱ्यांना कोणाचा आशीर्वाद आहे? संबंधित अधिकारी या प्रकाराकडे दुर्लक्ष का करत आहेत? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. कल्याण-डोंबिवलीतील फुटपाथवरील अतिक्रमणाचा मुद्दा यापूर्वीही अनेकदा चर्चेत आला आहे. जुलै २०२६ मध्ये करण्यात आलेल्या पाहणीतही कल्याण पश्चिमेतील अनेक फुटपाथ अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांसाठी अपुरे ठरत असल्याचे निदर्शनास आले होते. मात्र त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचे सध्याच्या चित्रावरून दिसत आहे.
फुटपाथ हा पादचाऱ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी असताना त्याचा व्यावसायिक वापर होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. विशेषतः रेल्वे स्थानकासारख्या अतिगर्दीच्या परिसरात फुटपाथ अतिक्रमित राहणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कल्याण स्टेशनसमोरील फुटपाथवरील अतिक्रमण तातडीने हटवून तो पूर्णपणे पादचाऱ्यांसाठी खुला करावा, अशी मागणी होत आहे. त्याचबरोबर एकदा कारवाई केल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी नियमित पाहणी आणि कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.
आता फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर महापालिका प्रशासन कारवाई करणार का? आणि कल्याण स्टेशन परिसरातील पादचाऱ्यांना त्यांचा हक्काचा फुटपाथ कधी मिळणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.






