
राज्यात मोठं जलसंकट; बीडला सर्वाधिक फटका,
बीड : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये यंदा तीव्र जलटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले असून, बीड जिल्हा या संकटाचे केंद्रबिंदू ठरत आहे. एल निनोचा प्रभाव आणि कमकुवत मान्सूनमुळे जिल्ह्यातील पाणीसाठे आटत चालले आहेत. जून महिना अर्धा उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
जिल्ह्यातील १७३ लहान-मोठ्या जलाशयांपैकी ८१ पूर्णपणे कोरडे पडले आहेत, तर ७९ जलाशय ‘डेड स्टोरेज’ स्थितीत पोहोचले आहेत. सध्या केवळ १३ जलाशयांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असून तोही पुढील काळासाठी अपुरा मानला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये ग्रामीण भागातील नागरिक कोरड्या तलावांमध्ये खड्डे खोदून पाणी शोधताना दिसत आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी लांब अंतर पार करावे लागत असून, टँकरवर अवलंबित्व वाढले आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. जलस्रोतांमधून बेकायदेशीररीत्या पाणी उपसा करणाऱ्यांविरुद्ध थेट एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अशा प्रकरणांमध्ये संबंधित ठिकाणचे वीज कनेक्शन तातडीने तोडण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
शेतीवरही संकट
जलटंचाईचा फटका शेती क्षेत्रालाही बसत आहे. अनेक गावांतील सिंचन व्यवस्था ठप्प झाली असून, खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पिकांसाठी पाणी उपलब्ध नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. जनावरांसाठी चारा आणि पाण्याची टंचाईही गंभीर बनली आहे.
विविध शहरांत पाणीपुरवठा नियमित नाही
उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याची मागणी वाढली असली तरी पुरवठा घटत आहे. लातूर जिल्ह्यातील औसा शहरात तब्बल १२ दिवसांनी एकदा पाणीपुरवठा होत आहे. तर नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये १३ दिवसांच्या अंतराने नळांना पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना पिणे, स्वयंपाक आणि दैनंदिन वापरासाठी पाणी जपून वापरावे लागत आहे. जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करणेही मोठे आव्हान ठरत आहे.
मराठवाड्यात सर्वाधिक गंभीर स्थिती
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. शेकडो गावांमध्ये नागरिक टँकरची वाट पाहताना दिसत आहेत. आधीच दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात यंदाच्या कमी पावसाने आणि प्रदीर्घ उष्णतेने परिस्थिती आणखी बिकट केली आहे. कमी पर्जन्यमान आणि कोरड्या हवामानामुळे विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोत झपाट्याने आटत असून ग्रामीण भागातील अडचणी वाढत आहेत.