Malegaon Sakhar Karkhana News: 'माळेगाव'कडून गाळपाची जोरदार तयारी! १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय
माळेगाव सहकारी साखर कारखाना लि., शिवनगर येथे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अग्निप्रदीपन सोहळा बुधवारी (२३ सप्टेंबर) उत्साहात पार पडला. कारखान्याचे उपाध्यक्ष नितीनकुमार शेंडे व त्यांच्या पत्नी कविता शेंडे यांच्या हस्ते बॉयलरचे अग्निप्रदीपन करण्यात आले. यावेळी शेंडे बोलत होते.
यावेळी बोलताना शेंडे यांनी आगामी हंगामात १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे सांगितले. यामध्ये सभासदांचा सात लाख आणि गेटकेनधारकांचा सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे नियोजन आहे. गेटकेनधारकांचा कारखान्यावर विश्वास असून, हंगामाच्या प्रारंभीच गेटकेन ऊसाचे गाळप करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘‘सभासद, गेटकेनधारक, कर्मचारी आणि कामगारांच्या सहकार्याने गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. स्व. अजित पवार आणि अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज पारदर्शक पद्धतीने करण्यात येईल,’’ असे शेंडे यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, जिल्हा बँक संचालक दत्तात्रय येळे, संचालक शिवराज राजे जाधवराव, योगेश जगताप, रतनकुमार भोसले, तानाजी कोकरे,विजय तावरे, मदन देवकाते,स्वप्नील जगताप, जयपाल देवकाते, संगीता कोकरे, ज्योती मुलमुले, युनियन अध्यक्ष विनोद तावरे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदीप बांदल, मा जि.प अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्यासह कर्मचारी, कामगार आणि शेतकरी सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश देवकाते यांनी केले. शिवराज राजे जाधवराव यांनी आभार मानले.






