File Photo : manoj jarange
आंतरवली सराटी : निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राज्य सरकार मते मिळवण्याचे काम करत आहे. पण हे सर्व करताना मराठा आरक्षणासंबंधीच्या सगे-सोयरेच्या मागणीकडे दुर्लक्ष करुन मराठा समाज हातातून जाऊ देऊ नका, असा खुला इशारा मराठा आरक्षणाचा लढा उभारणारे मनोज जरांगे यांनी केला आहे. शुक्रवारी (ता.5) अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. पण त्यांच्या या इशाऱ्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांची आजपासून (६ जुलै) मराठवाड्यात शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. मराठा आरक्षणासाठी ते मराठवाड्यात शांतता रॅली काढणार आहेत. पण या रॅलीला सुरूवात करण्याआधीच जरांगे पाटलांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणावरुन थेट इशारा दिला आहे. याचवेळी त्यांनी केलेल्या मागण्यांचीही पुन्हा आठवण करून दिली आहे.
मराठा आरक्षण देणे, आमच्या व्याख्याप्रमाणे सगे-सोयरे कायद्यांची अंमलबजावणी, गुन्हे मागे घेणे, मुलीना मोफत शिक्षण लागू आणि त्यांची मुलींची फी माफ करणे, , हैद्राबादसह वेगवेगळ्या संस्थाचे गॅजेट स्वीकारणे, जात प्रमाणपत्र वाटप चालू करणे, या मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वात मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातून मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढली जाणार आहे.
तसेच, आमचा राज्य सरकारवर विश्वास आहे. ते नक्कीच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतील, आमच्या जनजागृती रॅलीला गालबोट लागणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचवेळी या जनजागृती रॅलीला गालबोट लागल्यात त्याला सरकार जबाबदार असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
ओबीसी आणि मराठा समाजात कोणताही वाद नाही, आम्ही जातीय तेढ निर्माण होईल असे काहीही करणार नाही. कायद्याने आणि संविधानाने सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे दोन्ही समाजाने शांतता पाळावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.