Mumbai Famous Ganpati Mandal: घरगुती दीड ते पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर मुंबईकरांना ओढ लागते ते सार्वजनिक गणपतीच्या दर्शनाची. आकर्षक भव्य दिखावे, हे मुंबईतल्या गणेश मंडळांचं वैशिष्ट्य आहे. या मुंबईतल्या गणपतीचं दर्शन घ्यायचं असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी.
सोशल मीडियाच्या माध्यमांतून मुंबईचे प्रसिद्ध गणपती मंडळ आणखीनच प्रकाशझोतात आलेत. गणेश मंडळाच्या गणपतींच दर्शन घेण्यासाठी भाविक देशाच्या राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून येत असतात. अनेकदा मुंबईत असुनही कोणत्या मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी कोणत्या स्थानकावर उतरायचं हे काहींना कळत नाही. त्यामुळे आज जाणून घेऊयात मुंबईच्या गणेश मंडळाच्या गणपतीच्या दर्शनाला जात काय करावं?
मुंबईच्या प्रसिद्ध गणेश मंडळांपैकी एक म्हणजे लालबागचा राजा. या ठिकाणी पहिल्या दिवसापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत भाविकांची मोठी गर्दी असते. लालबागला जाण्यासाठी ट्रेन, बस आणि टॅक्सी असे पर्याय आहेत.
मध्य रेल्वे
तुम्ही कल्याण किंवा ठाणे म्हणजेच मध्य रेल्वेने येणार असाल तर, परेल किंवा करीरोड स्थानकात उतरुन तुम्ही चालत जाऊ शकता.
तसंच पश्चिम रेल्वेवरुन लोअर परेल स्थानकात उतरुन तुम्ही चालत जाऊ शकता. हार्बन लाईन वरुन चिंचपोकळी स्थानकावरुन देखील लालबागला जाणं सोयीचं पडतं. त्याचप्रमाणे बेस्टच्या बसेस देखील लालबागला जाण्यासाठी सोयीच्या आहेत. य़ाशिवाय दादर, परळ वरळी येथून तुम्ही टॅक्सीने देखील जाऊ शकता.
लालबागप्रमाणेच मानाचा दुसरा गणपती म्हणजे गणेश गल्लीचा राजा. हे गणेश मंडळ देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. लालबागच्या राजापासून दहा ते पंधरा मिनिटे चालत गेलात की तुम्हाला गणेश गल्लीच्या राजाचं दर्शन होईल. गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेश गल्ली, लालबाग, परळ, मुंबई – ४०००१२ असा गणेश गल्ली मंडळाचा पत्ता आहे.
चिंचपोकळीचा चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोकळी, मुंबई – ४०००१२ असा या मंडळाचा पत्ता आहे. मुंबईच्या प्रसिद्ध गणेश मंडळांपैकी एक असा चिंचामणी. तुम्ही मध्ये, पश्चिम किंवा हार्बर मार्गाने येत असाल चिंचपोकळी स्थानकात उतरा.तुम्हाला चिंचपोकळी स्टेशनच्या अगदी समोरच ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’चा मंडप दिसेल.
१९४७ साली तेजुकाया गणपती मंडळाकडून दरवर्षी पर्यावरणपूरक मूर्ती साकारली जाते. हे मंडळाचं वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे या गणेशमूर्तीवर सोन्याचे दागिने घातले जातात. त्यामुळे अनेक जण गणरायाची ही मूर्ती पाहण्यासाठी आवर्जून येथे येतात.परळ स्टेशनवरून चालत 10 मिनिटांवर तेजुकायाचा, लालबाग” हे गणपती मंडळ दिसेल. लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा आणि तेजुकाया हे गणेश मंडळ जवळपासच आहेत.
माटुंगा येथील जीएसबीच्या गणेश मंडळाला देखील मानाचं स्थान आहे. १९५५ मध्ये कर्नाटकातून आलेल्या गौड सारस्वत ब्राह्मण समुदायाने या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. मांटुगा परिसरातील या गणपतीचं दर्शन घेण्यास भाविक कानाकोपऱ्यातून येतात. जीएसबी सेवा मंडळ गणपती, शीव (किंग्स सर्कल) वडाळा, मुंबई- ४०००२२ हा गणपती किंग्ज सर्कल येथील आर्य समाज हॉलजवळ विराजमान केलेला असतो.
कसं जायचं
हार्बर लाईनः किंग्ज सर्कलवरुन चालत 5 मिनिटांच्या अंतरावर हे गणेशमंडळ आहे.
सेंट्रल लाईनः माटुंगा किंवा सायनला उतरून 5 मिनिटांच्या अंतरावर चालत जाऊ शकता.
वेस्टर्न लाईनः दादरवर उतरून हार्बर लाईनला बदल करून किंग्ज सर्कलला उतरा.