देशातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा (फोटो- ani)
IMD Rain Alert: आज सकाळपासूनच राजधानी दिल्ली-एनसीआर भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज राजधानी दिल्लीत मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. दरम्यान भारतीय हवामान विभागाने कोणत्या कोणत्या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, ते जाणून घेऊयात.
उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पर्वतीय राज्यांमध्ये देखील अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क रहाण्याचे आवाहन केले आहे. कोणत्या राज्यात कसे वातवरण राहील याबाबत हवामान विभागाचा इशारा काय आहे, हे जाणून घेऊयात.
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आज हवामान पावसाळी राहू शकते. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पावसाचा जोर साधारणपणे कमी होतो, मात्र यावर्षी अजूनही पावसाचा जोर कायम असल्याचे दिसून येत आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहू शकतो. उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो. यामुळे तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे म्हटले जात आहे.
उत्तराखंडमध्ये असे असणार हवामान?
उत्तराखंडमधील सात जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चामोली, बागेश्वर, पिठोरागड जिल्ह्यात अति ते अति मुसळधार पासचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंड राज्यात भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सुरक्षिततेतच्या कारणामुळे चमोली जिल्ह्यात सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
कोणत्या राज्यांना अलर्ट
छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि पर्वतीय राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आता आहे. दक्षिण भारतात आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणात देखील पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आधी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.