सिल्लोड : सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आला न असून, महाराष्ट्राच्या ७६ वर्षांच्या इतिहासात असे कधीच घडले नाही ते या पाच वर्षात घडले. प्रत्येक पक्ष आळीपाळीने सत्तेत आला पण मराठा समाजाला टिकणारे आरक्षण कोणीच दिले नाही. आता सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाहीच असे मनोज जरांगे यांनी ठणकावून सांगितले.
सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त आयोजित संवाद मेळाव्यात जरांगे म्हणाले की, सत्तावन लाख मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण, मुलींना मोफत शिक्षण आणि आठ हजार मराठ्यांना नोकरी हे फक्त आपल्या एकजुटीमुळे घडले असून, आता मात्र मराठ्यांना हेवेदावे, व्यसन, बांधावरून भांडणे सोडून कालानुरूप बदलावे लागेल.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना त्यांनी मराठा बांधव आणि माझ्यावर सतत दाखल होत असलेल्या गुन्ह्याबद्दल आता त्यांना क्षमा नसल्याचे वक्तव्य केले. तसेच तुम्ही कितीही डाव टाका, मराठा प्रतिडाव टाकण्यात तरबेज असल्याचे सांगून, टप्यात आले की वाजवणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.