
Manoj Jarange Patil, Maratha Reservation
म्हावशी, ता. पाटण येथील सुस्वाद मल्टिपर्पज हॉलमध्ये आयोजित केलेल्या सकल मराठा समाज संवाद मेळाव्यात ते बोलत होते. प्रारंभी त्यांनी छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर मराठा आरक्षणाचे जनक अण्णासाहेब पाटील व मराठा संघटक स्व. बाळासाहेब जगताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जरांगे-पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज एकवटतोय ही आनंदाची बाब आहे. लेकरा बाळाचे भविष्य आपल्याला उज्ज्वल करायचे आहे. सरकार आपल्यासाठी काही करू शकत नाही. मराठ्यांनाच एकत्रित येवून लढा द्यावा लागणार आहे.
मराठ्यांचे हित सरकारच्या हातात नाही तर आपल्याच हातात आहे. अशक्य ते काही नाही, मात्र त्यासाठी आपल्याला आता मोठा संघर्ष करावा लागणार आहे. आपण सर्वजण नेते, पक्ष करत बसलो. आपणच नेते व पक्षाला मोठे केले. मात्र आपल्या लेकरा बाळांना मोठे करायला ते तयार नाहीत. नेत्यांच्या मागे फिरून प्रचार करत राहिलो. पण तुम्ही नेत्यांना कधी जाब विचारला नाही म्हणून आपल्या लेकरावर आज हमाली करायची वेळ आली आहे. आपणच चुकलो आहे. आता योग्य वेळ आली आहे. आता २९ ऑगस्टला आरपारची लढाई करायची आहे. त्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे. मी सरकारला घाबरत नाही. कुणाचाही बाप येवू देत. माझ्या समाजाचे वाटोळे करणाऱ्याला मी सोडणार नाही. मला नेता व पक्षाची गरज नाही. माझा समाज माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मराठ्यांच्या विरोधात जो जाईल त्याचा मी बाजार उठवणार.
आम्हाला ओबीसीच्या वाट्याचे आरक्षण नको. मात्र ५८ लाख नोंदी निघाल्या. त्यांना हक्काचे प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे. राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करू नका. मुख्यमंत्री म्हणाले ओबीसी नेत्याला टार्गेट करू नये. याचा अर्थ त्यांनी नेत्यालाच लाँच केले, असा टोला लगावून ते म्हणाले, बावनकुळेंनी मराठ्यांचे वाटोळे केले. आता सर्व आमदार व खासदारांनी मराठा समाजाच्या बाजूने उभे रहावे. मराठा तुम्हाला कधी विसरणार नाही. तुम्ही आमच्या बाजूने येत नाही याची आम्हाला लाज वाटते. आंदोलन शांततेत करायचे आहे. समाजाचा अपमान सहन करायचा नाही.
मुंबईलासुद्धा मराठा जाऊ शकतो याचे सरकारने भान ठेवावे. आरक्षण नाही म्हणून मराठ्यांना नोकऱ्या नाहीत. कष्ट करून मराठा समाज पुढे आला आहे. समाजावर अन्याय होऊ देऊ नका, समाजात एकजूट ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. मनोहर यादव यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. मराठा समाजातील विद्यार्थिनींनी स्वागत केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदाम पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नीलेश तारू यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मराठा बांधव भर पावसात उभे होते. मनोज जरांगे-पाटील यांचे ढेबेवाडी, विहे, मल्हारपेठ, नवारस्तासह ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. पाटण शहरात ते दाखल होताच ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करत, जेसीबीतून पुष्पवृष्टी करत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. कार्यक्रमस्थळी दाखल होताच पाटणमधील मराठा समाजाचे संघटक स्व. बाळासाहेब जगताप यांच्या पत्नी श्रीमती स्नेहप्रभा जगताप यांनी त्यांना राखी बांधून मराठा समाजासाठी लढणाऱ्या भावासाठी पाठबळ दिले. सकाळपासून सभेसाठी येणाऱ्या लोकांच्या चहा, नाष्ट्याची सोय पाटण शहरातील मुस्लिम बांधवांच्यावतीने करण्यात आली होती.