फोटो - सोशल मीडिया
छत्रपती संभाजीनगर : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे. अद्याप निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला नसला तरी देखील निवडणूकीची जोरदार तयारी सुरु आहे. यंदाची विधानसभा रंगणार आहे. महायुती व महाविकास आघाडी यासह मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे देखील विधानसभा निवडणूकीमध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत. जरांगे पाटील यांनी देखील तयारी सुरु केली असून लवकरच ते त्यांचा निवडणूकीबाबतचा निर्णय देखील जाहीर करणार आहे. मनोज जरांगे पाटील यांचे आता जनसंपर्क कार्यालय पूर्णत्वास येत आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे अशी मागणी जरांगे पाटील करत आहेत. ही मागणी पूर्ण केली नाही तर राजकारणात उतरणार असा आक्रमक पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतला आहे. त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. तसेच दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील यांनी निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. दौरे आणि सभा वाढल्या असून आता कार्यालय देखील स्थापन केले जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे कार्यालय तयार होत आहे. कार्यालयाचे काम पूर्णत्वास येत असून जोरात काम सुरु आहे. संभाजीनगर धुळे रोड या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय असणार आहे.
राजकीय नेत्यांप्रमाणे आता मनोज जरांगे पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय असणार आहे. या कार्यालयातून जरांगे पाटील हे मराठा समाजाचा कारभार हाकणार आहे. मराठा समाजाच्या तक्रारी व समस्या जाणून घेणार आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणूकीसाठी देखील या जनसंपर्क कार्यालयाचा वापर केला जाणार आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्याबाबत रणनीती ठरवण्यात येणार आहे. तसेच विधानसभेची खलबतं देखील याच जनसंपर्क कार्यालयामध्ये होणार आहे. इच्छुकांचे उमेदवारी अर्ज देखील या ठिकाणी स्वीकारण्यात येणार आहे. तसेच इच्छुकांची मुलाखती स्वतः जरांगे पाटील घेणार आहेत. त्यामुळे या कार्यालयाचा मोठा फायदा त्यांना होणार आहे. या कार्यालयाचे काम अद्याप सुरु असून लवकरच ते तयार होणार आहे.