संग्रहित फोटो
इचलकरंजी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी येत्या गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. 29 ऑगस्टला मुंबईत दाखल होणारच, कोणीही आडवं आलं तरी थांबणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास मुंबई सोडणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळेल, अशीही चर्चा सुरु आहे. या लढाईत सहभागी होण्यासाठी हातकणंगले तालुक्यातून २५ हजाराहून अधिक मराठा बांधव २७ ऑगस्ट रोजी मुंबईकडे रवाना होणार आहेत, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. यामुळे आता सरकारची चिंता वाढली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने वेळकाढुपणा केला आहे. मागच्यावेळी मुंबईकडे जाणारे मराठ्यांचे वादळ रोखून सरकारने फसवा आदेश देऊन फसवणुक केली. त्यामुळे २९ ऑगस्टची ही लढाई अंतिम असेल, असा इशाराही देण्यात आला. या आंदोलनासाठी मुंबईकडे तालुक्यातील प्रत्येक मराठा समाजाच्या घरातील एक व्यक्ती सहभागी होईल, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्येक गावात बैठका, सोशल मिडीयाचा प्रभावी वापर आणि प्रसारमाध्यमांद्वारे मराठा बांधवांना आवाहन करण्यात येत असल्याचे पत्रकार बैठकीत सांगण्यात आले.
भविष्यात आपल्या पिढीसाठी या आंदोलनात मराठा बांधवांनी सहभागी व्हावे असे यावेळी सांगितले. यावेळी शिवाजी पाटील, कृष्णात बाणदार, मिलींद पाटील, संतोेष सावंत, शहाजी भोसले, प्रथमेश माने, शाम यादव, शरद पाटील, रमेश घोरपडे, अभिजीत घोरपडे, प्रशांत निकम, दिपक पाटील, सुभाष चव्हाण, राजेंद्र वाडकर, सागर चव्हाण, सुशांत पोळ, सुनिल दळवे, संदीप पाटील यांच्यासह सकल मराठा समाजातील बांधव उपस्थित होते.
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
अंतरवाली सराटीत झालेली चूक पुन्हा करू नका, तुम्ही जर काही भानगड करायला जाल तर त्याची किंमत तुमच्यासह पंतप्रधानांना देखील भोगावी लागेल, असा इशारा मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. एकदा आमचे डोके फुटले, अजूनही आमच्या अंगातल्या गोळ्या निघाल्या नाहीत. आंतरवलीतील आया बहिणी दुःख सहन करावं लागलं, गुढघ्याचे ऑपरेशन झाले, मांड्यांला टाके घेतलेत. त्यामुळे फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो पुन्हा ती चूक नाही करायची, आणि त्या भानगडीत पडायचं नाही. असंही जरांगेंनी म्हटले आहे.