मनोरमा खेडकर यांना अटक
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी महाडमधून मनोरमा खेडकर यांना बेड्या ठोकल्या आहेत. शेतकऱ्याला बंदुकीचा धाव दाखवल्याप्रकरणी पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्या एका शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत असल्याचं दिसत होतं. याप्रकरणी आता पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली असून मनोरमा खेडकर यांना महाडमधून अटक करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर चर्चेत आहेत. पूजा खेडकर यांची पुण्यातून थेट बदली वाशीमला करण्यात आली. याठिकाणी त्यांनी कारभार स्वीकारला असून त्यांच्याबाबत रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. IAS पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात असतानाच आता त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा देखील एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये त्या हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यावर दमदाटी करत असल्याचं दिसत आहे. या घटनेनंतर संबंधित शेतकऱ्याने खेडकर दाम्प्त्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पुण्यातील पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर व दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यापासून मनोरमा खेडकर बेपत्ता होत्या.
याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांनी मनोरमा यांना कारणे नोटीस पाठविली होती. ‘तुम्ही शस्त्राचा दुरूपयोग करून परवानाविषयक अटी व शर्तीचा भंग केला आहे. त्यामुळे तुमचा शस्त्र परवाना का रद्द करण्यात येऊ नये, याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत असून, 10 दिवसांत लेखी म्हणणे मांडावे, तुम्ही नोटीसला उत्तर न दिल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल.’ अशा आशयाची नोटीस पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केली होती. तसेच या घटनेनंतर पुणे पोलीस मनोरमा खेडकर यांचा शोध घेत होते. मनोरमा खेडकर महाडमधील एका हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार आज पुण्यातील पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना रायगड जिल्ह्यातील महाड येथील एका हॉटेलमधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस स्थानकामध्ये याची नोंद करण्यात आली असून पोलीस त्यांना पुण्याला घेऊन जात आहेत. तिथे त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती समोर आली आहे.
काय आहे प्रकरण?
एका जमिनीच्या मालकी हक्कावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात आले आहे. ही जमीन मुळशी तालुक्यातल्या धडवली गावातली असल्याचं सांगितलं जात आहे. धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली होती. मात्र ती जमीन ताब्यात घेताना त्यांनी शेजाऱ्यांचीही जमीन ताब्यात घ्यायचा प्रयत्न केल्यामुळे गावकऱ्यांनी आक्षेप घेतला आणि त्यातून हा वाद उद्भवला, असं सांगितलं जात आहे. या वादाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मला कायदा सांगू नका, सातबाऱ्यावर माझं नाव आहे, असं मनोरमा खेडकर शेतकऱ्यांना दरडावून सांगताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसेच शेतकऱ्यांना ओरडत असताना त्यांनी शेतकऱ्यावर बंदूक देखील रोखली होती. त्यांचा रिव्हॉल्व्हर रोखून दमबाजी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.