मुंबई : जालना मराठा आंदोलनाला आज 13 दिवस पूर्ण होत आहेत. यावरून राज्यातील राजकारणात मोठी चक्रे फिरत असल्याचे पाहायला मिळाले. आज मराठा आरक्षणावर सखोल चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत एक बैठक बोलावली आहे. या सर्वपक्षीय बैठकीला अनेक महत्त्वाचे नेते अनुपस्थित असल्याचे निदर्शनास येत आहे. महत्त्वाचे म्हणजे मराठा आरक्षणासाठी गठीत करण्यात आलेल्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीच बैठकीसाठी उपस्थिती नाहीये.
मराठा आरक्षणासाठी मागच्या १३ दिवसांपासून जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या परंतु तोडगा निघालेला नाही. मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी जरांगेंची मागणी आहे. त्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे या बैठकीला उपस्थित नाहीत. तसेच विनय कोरे, बच्चू कडू, महादेव जानकर, हितेंद्र ठाकूर, रवी राणा, अशोक चव्हाण, नाना पटोले, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, जयंत पाटील (शेकाप) हे नते अनुपस्थित आहेत.
विशेष म्हणजे मंत्रिमंडळ उपसमितीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण हेदेखील या बैठकीला उपस्थित नाहीत. तर उपस्थित नेत्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, सुनील तटकरे, रेखा ठाकूर, कपिल पाटील, छगन भुजबळ, अनिल परब, राजेश टोपे, जयंत पाटील, सदाभाऊ खोत, संभाजीराजे छत्रपती, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, राजू पाटील, उदय सामंत, चंद्रशेखर बावनकुळे, दादा भुसे या नेत्यांचा समावेश आहे.
दरम्यान, जालन्यातील अंतरवाली येथे १ सप्टेंबर रोजी पोलिसांनी उपोषणकर्त्यांवर तुफान लाठीहल्ला केला होता. राज्यभरात त्या घटनेचा निषेध झाला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. सरकारने दोनवेळा जीआरदेखील काढला मात्र जरांगेंचं समाधान झालं नाही.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मनोज जरांगेंनी लावून धरली आहे. उद्या त्यांच्या उपोषणाचा पंधरावा दिवस आहे. त्यांनी औषध, पाणी आणि सलाईन नाकारलेलं आहे. त्यामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री काय बोलतात, हे पाहावं लागेल.
Web Title: Maratha reservation case chairman of maratha reservation sub committee chandrakant patil absent then many important leader absent nryb