फोटो - सोशल मीडिया
जालना : मराठा आरक्षणाचा मुद्दा राजकीय वर्तुळाच्या केंद्रस्थानी आलेला आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मागील अनेक महिने उपोषण केले. ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे अशी मागणी जरांगे पाटील यांची आहे. त्याला ओबीसी समाजाचा विरोध असल्यामुळे आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला नवीन तारीख देत आऱक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला असून यावेळी त्यांनी खळबळजनक दावा केला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले आहेत. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर नक्की कोण कोणते नेते आहेत याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
काय म्हणाले जरांगे पाटील?
“मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आम्ही केलेली आहेच. फक्त सत्ताधारी पक्षाला नाही तर विरोधकांना देखील आम्ही सांगतो. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा. सत्ताधारी आणि विरोधकांनी 70 वर्ष आमची मतं घेतलेली आहेत. त्यामुळे भूमिका स्पष्ट केली पाहिजे. जर हे भूमिका स्पष्ट करत नसतील तर यावेळी मराठा समाज त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही” असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
मराठा ठोक क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मागील दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीबाहेर आंदोलन करत आहेत. यावरुन वातावरण गरम असताना याबाबत जरांगे पाटील यांनी मोठा दावा केला आहे. जरांगे पाटील म्हणाले, आता आम्ही टेन्शन घेत नाहीत. कारण लवकरच पर्दाफाश होणार आहे. कारण 12 ते 13 संघटना देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून दरेकरांनी जमा केल्या आहेत. मराठा समाजाच्या बाजूने न बोलता फक्त काहीही बोलायचं असं त्यांनी सांगितलं. आता आणखी दोन ते तीन दिवस थांबा, मग आणखी पर्दाफाश होईल. डोंबिवली, माहिम आणि मलबार हिलमध्ये आणि आणखी कुठे-कुठे बैठक झाली? या बैठकांना कोण-कोण होतं? कोण आमदार होते? हे माहिती आहे”, असा मोठा दावा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.