
ऑटो-टॅक्सी चालकांसाठी मराठी आजपासून बंधनकारक; नियम न पाळल्यास परमिटच होणार रद्द
मुंबई : महाराष्ट्रात मराठी भाषेचा आदर राहावा यासाठी अनेक राजकीय पक्ष असो वा संघटना यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच महाराष्ट्र सरकारनेही मराठी भाषेवर भर दिला आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात आता ऑटो-टॅक्सी चालवण्यासाठी व्यावहारिक मराठीचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. मराठी बोलता येत नसलेल्या चालकांना आजपासून नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. पण, यादरम्यान मराठी शिकण्यासाठी कालावधी दिला जाणार आहे. जर तरीही मराठी नाही आली तर परमिटच रद्द केले जाणार आहे.
राज्य सरकारच्या संबंधित चालकांना सुरुवातीला एक महिन्यात मराठी शिकण्याची संधी दिली जाईल. त्यानंतरही मराठीचे ज्ञान नसल्यास चालकाचा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो. त्यानंतरही नियमांचे पालन न केल्यास बॅज आणि परमिट रद्द करण्याची कारवाई केली जाईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
राज्यातील आतापर्यंत सुमारे १ लाख ६५ हजार ६०० गैरमराठी चालकांनी प्रशिक्षण घेतले आहे. सरनाईक म्हणाले की, सरकारचा उद्देश कोणाचाही रोजगार हिरावून घेणे हा नाही. महाराष्ट्र आणि मुंबईने देशभरातून आलेल्या नागरिकांना रोजगार दिला आहे. मात्र, राज्याची भाषा आणि संस्कृतीचा सन्मान करणे आवश्यक आहे. मराठीचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
रिक्षा-टॅक्सी परमिट बॅज जारी होणार
यापुढे नवीन परवाना आणि बॅज देताना आरटीओ अधिकारी चालकाची प्रत्यक्ष संवादातून व्यावहारिक मराठीची चाचणी घेतील. या चाचणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले जाणार आहे. बनावट अधिवास प्रमाणपत्रांची तपासणी केली जाणार असून, महाराष्ट्रातील १५ वर्षांच्या वास्तव्यासंदर्भात पोलिसांच्या माध्यमातून पडताळणी करण्यात येईल.
1989 पासून व्यावहारिक मराठीचे ज्ञान अनिवार्य
१९८९ पासून व्यावहारिक मराठीचे ज्ञान अनिवार्य आहे. १२ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या कायदेशीर व्यवस्थेच्या आधारे आता या नियमाची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. यासंदर्भातील निर्देश परिवहन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असेही सरनाईक यांनी म्हटले.