सासवड : पीएमआरडीएच्या हद्दीतील नागरीकांनी पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, यातील बांधकामाचे ३७० चौरस फुटांचे क्षेत्र आणि गावठाणापासूनचे पाचशे मिटरचे अंतर अशा अटी रद्द करण्यात आल्या असून याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन करीत या योजनेत सहभागी नागरीकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी दिले.
नुकत्याच पार पडलेल्या सासवड येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे, प्रधानमंत्री आवास योजना ( जिल्हा ) अंतर्गत पुरंदर तालुक्यातील ४३० घरकुलांना आमदार संजय जगताप यांच्या हस्ते बांधकाम परवानगी प्रारंभ प्रमाणपत्र तथा बांधकाम कार्यदेशी वितरण करून व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, पंचायत समितीच्या सदस्या सुनिता कोलते, सोनाली यादव, विठ्ठलराव मोकाशी, देविदास कामथे, संजय चव्हाण पीएमआरडीएचे भोर, पुरंदर, मावळचे कनिष्ठ शाखा अभियंता विलासराव आव्हाड, पुरंदरचे समन्वयक नाना कुंभारकर यांसह लाभार्थी नागरीक उपस्थित होते.
पाचशे मिटरचे अंतराची अटी रद्द
आमदार जगताप म्हणाले, पुरंदरमधून ६ हजार अर्ज मिळाले आहेत. ही संख्या १५ हजारांवर गेली पाहिजे. आता यातील बांधकामाचे ३७० चौरस फुटांचे क्षेत्र आणि गावठाणापासूनचे पाचशे मिटरचे अंतर अशा अटी रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पाच ते सात वर्षांतील बांधकामाला वाढीव खोल्यांना परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये १ लाख रुपये महाराष्ट्र शासन आणि दिड लाख रुपये केंद्र शासनाचे अनुदान मिळणार आहे. हे बांधकाम गुंठेवारी अथवा परवानगीमध्ये आडणार नाही.
पीडीसीसी, सासवड बँकेकडून मिळणार कर्ज
तसेच जिल्हा बँकेकडून बांधकामाला ८ टक्के व्याजदराने तसेच संत सोपानकाका सहकारी बँक बँकेकडून ८. १० टक्के व्याजदराने कर्जपुरवठा होणार आहे. दोन्ही बँकांकडून १५ लाखापर्यंत कर्ज देण्यात येणार असून नागरिकांच्या स्वप्नातील हे घर अधिकृत होणार आहे. भविष्यात पीएमआरडीए मध्ये टप्प्याटप्प्याने शहरीकरण आणि नियोजनबद्ध विकास होणार असून यानिमित्ताने चांगले सिमोल्लंघन होत असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.
पीएमआरडीएचे अभियंता आव्हाड आणि पुरंदरचे समन्वयक नाना कुंभारकर म्हणाले, ४३० घरकुलांच्या कामांना मंजुरी मिळाली असून वर्क अॉर्डर मिळाली आहे. आता ४३० घरकुलांची कामे सुरू होत असून ५७७ बांधकामांना दिवाळी पर्यंत मंजुरी मिळणार आहे. यामध्ये ४०० चौरस फूटापर्यंत पीएमआरडीए प्लॅन देणार आहे तर ४०० ते ६०० चौरस फूटांपर्यंत बांधकामाचा प्लॅन लाभार्थीने करायचा आहे. तसेच ठेकेदाराची नेमणूकही लाभार्थीने करायची असल्याचे अभियंता आव्हाड यांनी सांगितले.
लाभार्थ्यांच्या शंकाचे निरसन
यावेळी लाभार्थी व नागरीकांनी विविध प्रश्न उपस्थित केले. त्यास आमदार संजय जगताप, पीएमआरडीएचे अभियंता आव्हाड यांनी समर्पक उत्तरे दिली. कागदपत्रे, प्रस्ताव करणे, प्लॅन, आदींबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी नामदेव कुंभारकर, भाऊ दळवी, संदिप फडतरे, आण्णा खैरे, हेमंत वांढेकर, अमोल देशमुख, सचिन पठारे, धर्माजी गायकवाड, चंद्रकांत बोरकर, नाना शेंडकर, डॉ मनोज शिंदे, राहुल घारे, संभाजी नाटकर, अमोल कामठे, अमोल काळे, विष्णू मोकाशी, धनंजय काळे, यांसह लाभार्थी नागरीक उपस्थित होते. संजय चव्हाण यांनी प्रास्ताविक करून सुत्रसंचलन केले.
[read_also content=”भाजप आमदाराला खंडणी मागणाऱ्याला ठोकल्या बेड्या https://www.navarashtra.com/maharashtra/bjp-mla-handcuffed-to-extortion-demander-nrdm-332101.html”]
घरकुलांसाठी कोणालाही पैसे देऊ नका
या योजनेतील घरकुलांच्या फॉर्मसाठी काही ठिकाणी ५ हजारांपर्यंत पैसे घेतल्याच्या प्रकार घडल्याचे समजत आहे. या योजनेत फार्म व इतर कोणत्याही बाबीसाठी लाभार्थी नागरीकाने एक रूपायाही कोणाला देण्याची गरज नाही. यापुर्वी फार्म व इतर बाबीसाठी पैसे घेतले असल्यास तसेच फसवणूक केली असल्याचे सदर लाभार्थीने संबंधीतावर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी, त्यापुढील कारवाईचे आम्ही पाहतो, असे आवाहन आमदार संजय जगताप यांनी यावेळी केले.