Meeting Between Sushilkumar Shinde And Chandrakant Patil Is This A Sign Of Third Earthquake In Maharashtra Politics Nryb
काॅंग्रेसचा दिग्गज नेता भाजपच्या वाटेवर; राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप? वाचा सविस्तर रिपोर्ट
मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या काही दिवसांमध्ये मोठा भूकंप घडेल, असे संकेत वर्तवण्यात आले आहेत. त्यानंतर आज काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्याला भाजपकडून मोठी ऑफर आल्याचे वक्तव्य केले होते. विशेष म्हणजे त्यानंतर लगेच चंद्रकांत पाटील आणि सुशीलकुमार शिंदे यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. आता यावरून राज्यात पुन्हा तिसरा भूकंप होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सोलापूर : सोलापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे आणि भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या भेटीचा फोटोदेखील समोर आला आहे. विशेष म्हणजे ही भेट आणि भेटीचा फोटो समोर येण्याचे टायमिंग अतिशय महत्त्वाचे आहे. देशात पुढच्या काही दिवसांमध्ये लोकसभेची निवडणूक असणार आहे.
सुशीलकुमार शिंदे खरंच भाजपात जाणार?
सुशीलकुमार शिंदे यांची सोलापुरात ताकद आहे. त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे या स्वत: आमदार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुशीलकुमार शिंदे यांनी आताच एक मोठा गौप्यस्फोट केलाय. भाजपच्या एका बड्या नेत्याकडून आपल्याला पक्षप्रवेशाची ऑफर आल्याचा दावा सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. सुशीलकुमार शिंदे खरंच भाजपात जातात का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
प्रणिती शिंदे यांना भाजप प्रवेशासाठी मोठी ऑफर
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने चंद्रकांत पाटील आणि सुशीलकुमार शिंदे यांची भेट झाली आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीचा फोटो समोरही आलाय. विशेष म्हणजे अक्कलकोट येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या एका बड्या नेत्याकडून आपल्याला आणि मुलगी प्रणिती शिंदे यांना भाजप प्रवेशासाठी मोठी ऑफर आल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट घडून आली आहे.
दोन्ही नेत्यांची भेट
चंद्रकांत पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री आहेत. ते आज सुशीलकुमार शिंदे यांच्या गौप्यस्फोटानंतर शिंदे यांच्या निवासस्थानी गेले. यावेळी दोन्ही नेत्यांची भेट झाली. सोलापूरमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या निमंत्रण देण्यासाठी दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती समोर आली. पण आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात तिसऱ्या भूकंपाचे संकेत?
भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मोठा दावा करण्यात आलाय. लोकसभा निवडणुकीआधी पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरा भूकंप घडेल, असा दावा गिरीश महाजन यांच्याकडून करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या पक्षांमध्ये फूट पडली आहे. त्यानंतर आता काँग्रेस पक्षात फूट पडेल, असा दावा भाजपकडून केला जातोय. त्यानंतर आज सुशीलकुमार शिंदे यांचं वक्तव्य आणि नंतर त्यांची चंद्रकांत पाटील यांच्यासोबतची भेटीची बातमी समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय.
Web Title: Meeting between sushilkumar shinde and chandrakant patil is this a sign of third earthquake in maharashtra politics nryb