मुंबई : दुरुस्तीसह सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे (Maintenance) करण्यासाठी उद्या रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या (Central Railway) सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, हार्बर मार्गावर (Harbour Railway) कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच, पश्चिम रेल्वेवर (Western Railway) मुंबई सेंट्रल ते माहीम अप आणि डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे : सीएसएमटी ते विद्याविहार, अप-डाऊन धीमा मार्ग; सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५
ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या लोकल सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. पुढे धिम्या डाऊन मार्गावर वळवल्या जातील. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धिम्या लोकल विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबणार आहेत.
हार्बर रेल्वे : कुर्ला ते वाशी, अप-डाऊन मार्ग; सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०
ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-पनवेल/बेलापूर-सीएसएमटी आणि सीएसएमटी-वाशी अप-डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द असणार आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल-वाशीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील.
पश्चिम रेल्वे : मुंबई सेंट्रल ते माहीम, अप-डाऊन जलद मार्ग; शनिवार रात्री १२ ते पहाटे ४
ब्लॉकदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावरील लोकल मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ रेल्वे स्थानकांदरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत डाऊन दिशेच्या काही लोकल रद्द राहणार आहेत. रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही मेगाब्लॉक राहणार नाही.