अमरावती : शहरात रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण हटविण्याची (Removal of encroachments) महापालिका प्रशासनाकडून (Municipal administration) मागील काही दिवसांपासून कारवाई केली जात आहे. कारवाईच्या आठव्या दिवशी महापालिकेचा गजराज टांगा पडाव चौक, चांदणी चौक, सौदागर पुरा, पठाण चौक परिसरातील अतिक्रमण हटविण्यासाठी बलासह पोहाचले. मात्र, कारवाई दरम्यान सौदागरपूरा (Saudagarpura) येथे परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईचा विरोध दर्शविला.
गजराजच्या समोर एकत्रित येत नागरिकांनी अतिक्रमण विरोधी कारवाई (Anti-encroachment action) थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करीत जमावाला पांगविले. पोलिसांनी बल प्रयोग करीत नागरिकांना हुसकावून लावत अतिक्रमण हटविले. परिसरातील ५० पेक्षा अधिक दुकानांचे अतिक्रमण सोमवारी (१ ऑगस्ट) हटविण्यात आले.
सौदागरपुरा येथे जनावरांचे गोठे बांधत अतिक्रमण करण्यात आले आहे. गोठ्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी एक दिवसांचा अवधी महापालिका प्रशासनाकडून पशुपालकांना देण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत पशुपालकांनी स्वत:हून अतिक्रमण हटविले नाही तर, मनपाकडून कारवाई केली जाणार असल्याचे अतिक्रमण विभाग प्रमुख अजय बन्सेले यांनी सांगितले. नागपुरी गेट (Nagpuri Gate) परिसराला लागून असलेल्या सौदागरपूरा येथे पशुपालकांनी एका लाइनमध्ये अतिक्रमण करीत गोठे तयार केले आहे. अतिक्रमण विभागाने गोठे हटविण्याची कारवाई सुरू करताच नागरिकांची मोठी गर्दी एकत्रित आली. काही नागरिकांनी त्यांचे अतिक्रमण वाचविण्याकरिता गजराजच्या समोर येत कर्मचाऱ्यांना रोकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी नागरिकांचा प्रयत्न हाणून पाडत सौम्य लाठीचार्ज (Gentle lathicharge) करीत गर्दीला तितर-बितर करीत कारवाई केली.
शहरातील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या चांदणी चौक ते पठाण चौक दरम्यान अतिक्रमणावर महापालिकेचा गजराज चालला. इतवारा बाजार परिसर स्थित टांगापडाव चौकातून सकाळी ११ वाजता कारवाई सुरू करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण पथक पुढे कारवाई करीत गेले. चांदणी चौक, पठाण चौक, नागपुरी गेट परिसरात ५० पेक्षा अधिक दुकानांचे शेड, खोके, हातगाड्या, कच्चे व पक्के अतिक्रमण ध्वस्त करण्यात आले.
महापालिकेच्या हद्दीत अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई जोरात सुरू झाली आहे. शहराच्या विविध भागांतील अतिक्रमणांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावेळी मोठा फौजफाटा घेऊन ही अतिक्रमणे काढली जात आहेत. मर्यादेपेक्षा अधिक, अनधिकृत बांधकामे दुकानदारांकडून केली जातात. घरांच्या बाबतही आढळून आले आहे. बेकायदा बांधकामांची गय केली जाणार नाही, असा संदेशच यानिमित्ताने महापालिकेकडून देण्यात आला आहे. सोमवार, १ ऑगस्ट रोजी अतिक्रमण विभागाने चांदनी चौक पासून कारवाईला सुरुवात केली. त्यानंतर पठाण चौक ते वलगाव रोडवरील अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली.
या कारवाई दरम्यान वॉल कंपाऊंड, टिनाचे बांधकाम, पानठेले, अनधिकृत दुकाने, दुकानाचे शेड, बॅनर, पोस्टर, मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण नष्ट करण्यात आले. रस्ते व फुटपाथ मोकळे करण्यात आले. जेसीपीद्वारे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबविण्याचा निर्णय मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर (Commissioner Dr. Praveen Ashtikar) यांनी घेतला. अनधिकृत आणि वाहतुकीस अडथळा करणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली. कारवाई दरम्यान अतिक्रमण पथक प्रमुख अजय बन्सेले, अतिक्रमण विभागाचे पथक, झोनचे पथक व पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






