Saif Ali Khan: "काही झालं की हिंदू समाजावर..."; सैफ अली खान हल्ला प्रकरणावरून नितेश राणेंचा आव्हाडांवर निशाणा
मुंबई: राज्यामध्ये सध्या अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे वातावरण तापले आहे. बॉलीवुडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता सैफ अली खानवर त्याच्याच घरात जीवघेणा हल्ला करण्यात आला. रात्री 2 वाजता अज्ञात व्यक्तीने घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला. तसेच यामध्ये सैफी अली खानवर धारदार शस्त्राने सहा वार करण्यात आले. सध्या यावरून राजकारण तापले आहे. सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दरम्यान यावरून आता मंत्री नितेश राणे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान सैफ अली खानवर हल्ला झाला हे कळताच, खासदार सुप्रिया सुळे यांनी यांनी देखील सैफ अली खान यांच्या कुटुंबियांची चौकशी केली आहे. पुण्यातून सुप्रिया सुळेंनी सैफ अली खानच्या कुटुंबियांची फोनवर चौकशी केली आहे. त्यावरून आता मंत्री नितेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“महाविकास आघाडीचे सरकार असताना सुशांत राजपूत सारख्या अभिनेत्याची हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणात महाविकास आघाडीचे जे मुख्यमंत्री होते, त्यांच्या मुलाचे नाव आले होते. तेव्हा कोणीच काहीच बोलले नाही. त्यावेळी सुशांत सिंग राजपूतसाठी सुप्रिया सुळेंना बोलताना पाहिले नव्हते. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, सर्व समोर येईल. यांना आर्यन खान, सैफ अली खानची काळजी आहे मग सुशांत सिंग राजपूतची चिंता नव्हती का?” असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला.
हेही वाचा: अभिनेता सैफ अली खानवर चाकूने सहा वार! खासदार सुप्रिया सुळेंनी केली कुटुंबियांची विचारपूस
नितेश राणे यांचा जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर दिलेल्या प्रतिक्रियेवरर देखील नितेश राणे यांनी टीका केली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये कट्टरवाद आणि हिंदू समाजाला सातत्याने बदनाम करण्याचे षडयंत्र यांच्यासारख्या जिहादी मानसिकतेच्या लोकांकडून होते आहे. काही झालं की हिंदू समाजावर बोट उचलतात, त्यांच्याच मतदारसंघात जिहाद करणारे किती आहेत ते बघायला सांगा, अशा प्रकरे राणे यांनी आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा: “…धार्मिक कट्टरतावाद्यांकडून पूर्वनियोजित हा हल्ला”; सैफ अली खानवरील हल्ल्यावरुन राजकीय नेत्याचे गंभीर वक्तव्य
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी लिहिले आहे की, सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो. गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचे नाव तैमुर ठेवल्यावरुन टार्गेट केले जात होते. ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे? या दिशेने ही तपास होणे आवश्यक आहे, असा गंभीर सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.