अभिनेता सैफ अली खानवर झालेला हल्ला धार्मिक कट्टरवाद्यांनीकडून झाल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप करण्यात आला (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : बॉलीवुडचा लोकप्रिय अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करण्यात आला आहे. त्याच्या राहत्या घरी हा हल्ला करण्यात आला असून यामुळे सर्वांनी काळजी व्यक्त केली आहे. सैफी अली खानच्या वांद्रेमधील राहत्या घरी चोरांनी शिरून हा जीवघेणा हल्ला केला आहे. सैफ अली खानवर सहा वार करण्यात आले असून त्याच्यावर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. यावरुन मात्र राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधकांनी सत्ताधारी महायुती व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले आहे.
अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे बॉलीवुडसह संपूर्ण देशभरातून काळजी व्यक्त केली जात आहे. सैफवर शस्त्रक्रिया देखील पार पडली असून सध्या त्याची प्रकृकी स्थिरावली असून त्याचे कुटुंबिय देखील सुरक्षित आहेत. वांद्रे येथे रात्री तीन वाजता हा हल्ला झाला असून पोलीस या प्रकरणाचा जोरदार तपास करत आहेत. पोलिसांनी घरातील सीसीटीव्ही देखील तपासले असून सैफ याच्या घरातील तीन नोकरांना ताब्यात देखील घेतले आहे. या प्रकरणावरुन राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. मात्र शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चर्चांना उधाण आले आहे.
अभिनेता सैफ अली खानची हेल्थ अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी लिहिले आहे की, सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो. गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचे नाव तैमुर ठेवल्यावरुन टार्गेट केले जात होते. ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे? या दिशेने ही तपास होणे आवश्यक आहे, असा गंभीर सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे त्यांनी लिहिले आहे की, कारण सैफ अली खान यांच्यावर एकूण सहा वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर येत आहे.त्यातील दोन वार हे गंभीर स्वरुपाचे असल्याचे समजते.एक वार त्यांच्या मानेवर करण्यात आलेला आहे.त्यामुळे त्यांच्या मनक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता,वार हा जिवे मारण्याच्या हेतूनेच करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. सैफ अली खान हे भारतामधील चौथ्या क्रमांकाचा सन्मान समजल्या जाणार्या पद्श्री पुरस्काराने सन्मानित आहे. हे विशेष ! विष रंग दाखवतयं का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.