सातारा : किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) यांच्या कारखाना बचाव शेतकरी पॅनलचे आमदार मदन भोसले यांच्या पॅनेलचा पराभव करून सत्ता ताब्यात घेतली. या विजयाने आमदार मकरंद पाटील यांच्या राजकीय कौशल्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर प्रथमच मकरंद पाटील यांनी शनिवारी संध्याकाळी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची जलमंदिर येथे भेट घेतली. यावेळी खासदार उदयनराजे यांनी मकरंद पाटील यांचे पेढा भरवून त्यांचे कौतुक केले.
सहकारामध्ये राजकारणाचा कोणताही स्पर्श नसतो. हे सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये वारंवार सिद्ध झाले आहे. आमदार मकरंद पाटील यांनी उदयनराजे यांची घेतलेली भेट जिल्ह्याच्या राजकारणामध्ये चर्चा घडवून गेली. आमदार पाटील व खासदार उदयनराजे यांनी सुमारे पाऊण तास वेगवेगळ्या विषयावर दिलखुलास चर्चा केली. या चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पहिले आमदार मदन भोसले यांच्या शेतकरी विकास पॅनलच्या साडेनऊ हजार मतांच्या फरकाने दणदणीत पराभव केला. तब्बल 19 वर्षाची मदन भोसले यांची कारखान्यातील सत्ता संपुष्टात आली. आता किसनवीर कारखान्याला नवा चेअरमन कोण या प्रश्नाची चर्चा कारखान्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या पाच तालुक्यांमध्ये सुरू आहे.
यावेळी आमदार मकरंद पाटील यांनी या विजयानंतर शनिवारी सायंकाळी जलमंदिर येथे उदयनराजे यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा केली. सातारा तालुक्यामध्ये सुद्धा किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत मकरंद पाटील यांच्या पॅनलला विजयी करण्यामध्ये सातारा तालुक्याने सुद्धा प्रभावी कामगिरी बजावली.
खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपचे असल्यामुळे तालुक्यात भाजपचा वरचष्मा राहणार असा अंदाज होता. दोन्ही लोकप्रतिनिधींच्या राजकीय संपर्काचा उपयोग आमदार मदन भोसले यांना होणार याचीच चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात दोन्ही लोकप्रतिनिधींनी आपली ताकद राष्ट्रवादीच्या बाजूने उभी केली. खासदार उदयनराजे भोसले व माजी खासदार दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांचा ही स्नेह खूप जुना आहे.
खासदारकीच्या निवडणुकांमध्ये उदयनराजेंना वाई तालुक्याने नेहमीच साथ दिली होती. या राजकीय संदर्भाची या निमित्ताने पुन्हा उजळणी झाली कारखाना वाचणे महत्त्वाचे होते. त्याकरता नवे नेतृत्व समोर आले पाहिजे. आमदार मकरंद पाटील यांनी हा विजय शेतकरी सभासदांना सुपूर्त केला आहे. यात या शब्दात उदयनराजे यांनी त्यांचे कौतुक केल्याची चर्चा आहे.