खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर दौरा करत गावांना भेटी देत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली (फोटो - टीम नवराष्ट्र)
Maharashtra Wet drought : मोहोळ : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली. त्यांनी शिंगोली तरटगाव, पीर टाकळी, विरवडे, कामती, लांबोटी आदी गावांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे, घरांचे तसेच जनावरांच्या नुकसानीचे पाहणी केली.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे पिके वाहून गेली, मातीचे अपरिमित नुकसान झाले. अनेक घरात पाणी शिरल्याने अन्नधान्य व संसारोपयोगी वस्तूंचेही नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार शिंदे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या असून शासनाकडून मदत मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन देखील खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, “या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. शेतकरी व नागरिक गंभीर आर्थिक संकटात सापडले असून सोलापूर जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी,” अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच नदी व ओढ्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी विविध मागण्या मांडल्या यामध्ये प्रामुख्याने सर्व नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत, जनावरांसाठी चारा व सुग्रास तातडीने पुरवठा करण्यात यावा, बाधित नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात यावे, घरांची पडझड व पिकांचे नुकसान झालेल्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, शिंगोली, तरटगाव, विरवडे बु. येथे जनावरांसाठी सुग्रास व चारा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ही खा. शिंदे यांनी दिले, शेतकऱ्यांची कर्जमाफी करून नव्याने कर्जपुरवठा करण्यात यावा, गरजूं स्थलांतरित नागरिकांसाठी अन्न व चादरींची व्यवस्था तातडीने करण्यात यावी, अशा विविध मागण्या खा. शिंदे यांनी केले आहेत तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अन्यथा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आपण उपोषण करु असा ठाम इशारा खा. प्रणिती शिंदे यांनी दिला.