
‘विना वाहक’ बससेवा वाढवणार? एसटीचा आर्थिक डोलारा मजबूत करण्यासाठी परिवहन मंत्र्यांचा नवा मंत्र
ते एसटी महामंडळाच्या मुख्यालयात उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने बोलावलेल्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांच्या सह सर्व विभाग प्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक व विभाग नियंत्रक उपस्थित होते.
एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजनांचा आढावा घेताना मंत्री सरनाईक यांनी ही भूमिका मांडली. एसटीची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणे, अनावश्यक खर्चाला आळा घालणे आणि उपलब्ध मनुष्यबळ व संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे, या तिन्ही बाबींवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
‘एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे असेल तर केवळ तिकीट दरवाढ हा पर्याय असू शकत नाही. प्रवाशांना अधिक चांगली सेवा देत उत्पन्न वाढवणे आणि त्याचवेळी खर्च कमी करणे, हा शाश्वत मार्ग आहे,’ असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
विना वाहक बससेवेमुळे काही मार्गांवरील वाहकाचा खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते. डिजिटल तिकीट प्रणाली, क्यूआर कोड, स्मार्ट कार्ड तसेच इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ही सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
एसटीचा आर्थिक तोटा कमी करण्यासोबतच प्रवाशांचा एसटीवरील विश्वास अधिक दृढ होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रवाशांच्या गरजा, बदलती प्रवासाची पद्धत आणि स्थानिक मागणी लक्षात घेऊन प्रवासीभिमुख योजना राबवाव्यात, असे निर्देश परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले.
प्रवाशांना वेळेत, सुरक्षित, स्वच्छ आणि विश्वासार्ह सेवा मिळणे ही एसटीची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे ‘प्रवासी समाधानी तर एसटीची आर्थिक गाडी रुळावर’, या दृष्टिकोनातून भविष्यातील योजनांची आखणी करावी, असेही त्यांनी नमूद केले.
एसटी ही केवळ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे तिचे आर्थिक बळकटीकरण करताना प्रवाशांच्या हिताशी कोणतीही तडजोड न करता आधुनिक, कार्यक्षम आणि किफायतशीर सेवा देण्यावर भर राहील, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.