
‘दहा कोटींच्या उत्पन्नाचा पुरावा द्या, नाहीतर राजीनामा द्या!’ नरेंद्र मेहतांचे प्रताप सरनाईकांना थेट आव्हान
नाट्यगृहातून वर्षाला दहा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याच्या सरनाईक यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मेहता म्हणाले की, मोठ्या सभागृहाचे भाडे सुमारे ६८ हजार रुपये, तर छोट्या सभागृहाचे भाडे सुमारे ३५ हजार रुपये आहे. त्यातील अर्धे दिवस अथवा अर्ध्या दराने बुकिंग झाले, तरी उत्पन्नाचा आकडा दहा कोटी रुपयांपर्यंत पोहोचणे शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले.
“नाट्यगृह महिन्यातील तीस दिवस सुरू राहिले तरी त्यातून सुमारे २० लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न होत नाही. वर्षभर नाट्यगृह सुरू राहिले तरी हे उत्पन्न साधारण दोन ते अडीच कोटी रुपयांच्या आसपास राहील. मग दहा कोटी रुपयांचे उत्पन्न कुठून आले? दहा कोटींची खोटी माहिती द्यायची आणि तीच माहिती रेटून बोलायची, हेच प्रताप सरनाईक उत्तम प्रकारे करतात,” असा आरोप मेहता यांनी केला.
“जर नाट्यगृहातून दहा कोटी रुपयांचे उत्पन्न झाले असेल, तर त्याचा पुरावा द्या. आम्ही दोघेही—आमदार आणि महापौर—राजीनामा देऊ. मात्र हा दावा खोटा ठरला तर प्रताप सरनाईक यांनी राजीनामा द्यावा किंवा जनतेची माफी मागून ‘मी खोटे बोललो’ असे सांगावे,” असे आव्हान नरेंद्र मेहता यांनी दिले.
नाट्यगृहातील एसी बंद पडल्याच्या घटनेवरही मेहता यांनी भाष्य केले. “आदल्या दिवशी एसीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तो ट्रिप झाला होता. नाट्यगृहात सतत एकामागून एक कार्यक्रम होत असल्याने अशा प्रकारचे तांत्रिक बिघाड होऊ शकतात. मात्र एसीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम ज्या कंत्राटदाराकडे आहे, त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही. वारंवार अशा घटना घडत असतील तर संबंधित कंत्राटदारावर निश्चितपणे लक्ष दिले जाईल,” असे मेहता म्हणाले.
प्रताप सरनाईक यांनी नाट्यगृहाच्या प्रश्नावर ‘मनीऑर्डर पाठवू’ अशा स्वरूपाची टीका केल्याचा संदर्भ देत मेहता यांनी प्रतिहल्ला केला. “आज आम्ही सत्तेत आलो आहोत. मात्र तुम्ही सत्तेत असताना या नाट्यगृहाचे काम झाले. मग नाट्यगृहाचे काम अशा पद्धतीने का केले? तत्कालीन आयुक्त ढोले यांच्या काळात कोणत्या ठिकाणाहून एसी लावला, त्याचा आधी विचार करा. काम चांगल्या पद्धतीने केले असते तर आज हे दिवस पाहण्याची वेळ आली नसती,” असे मेहता यांनी म्हटले.
नाट्यगृहाचा वापर राजकीय कार्यक्रमांसाठी होत असल्याचा आरोपही मेहता यांनी केला. “या नाट्यगृहामध्ये त्यांच्या पक्षाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होत आहेत. एका शाळेचा कार्यक्रम रद्द करून त्याठिकाणी राजकीय कार्यक्रम घेण्यात आल्याचा प्रकारही घडला. राजकीय कार्यक्रमांसाठी रिसॉर्ट किंवा अन्य जागांचा वापर करा; जनतेसाठी असलेले नाट्यगृह जनतेसाठीच राहू द्या,” अशी टीका त्यांनी केली.
“राजकीय व्यक्तींना एखाद्या कार्यक्रमात अडथळा निर्माण झाला तर त्यांची वेदना आम्ही समजू शकतो. मात्र विधानसभा सदस्य आणि मंत्री म्हणून या शहराप्रती तुमची काही जबाबदारी नाही का? रस्त्यावर खड्डे पडले तरी आम्ही दोषी, एसी बंद पडला तरी आम्ही दोषी, प्रत्येक गोष्टीसाठी आम्हीच दोषी का? तुम्ही प्रत्येक वेळी आम्हालाच दोष देणार का?” असा सवालही नरेंद्र मेहता यांनी उपस्थित केला.
Narali Purnima: उत्तनमध्ये नारळी पौर्णिमेची धूम; पारंपरिक वेशभूषा, सजवलेले कलश अन् उत्साहात मिरवणूक