गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना गुड न्यूज; एसटीच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द
मंत्री सरनाईक म्हणाले, “गणपती उत्सव, मुंबई-ठाण्यातील कोकणवासी आणि एसटी यांचे अतूट नाते आहे. मुंबई, ठाणे येथील आपल्या घरापासून कोकणातील वाड्या-वस्त्यांपर्यंत एसटी बसद्वारे थेट जाता येत असल्याने कोकणवासी नेहमीच एसटीला प्राधान्य देत आले आहेत. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात सरासरी ५ हजार बसेस आरक्षित केल्या जातात.”
यंदा एसटी महामंडळाचा वाढता तोटा कमी करण्यासाठी नाईलाजास्तव एकेरी गट आरक्षणावर ३० टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयामुळे अनेक कोकणवासीय तसेच गणेशभक्त मंडळांनी प्रत्यक्ष भेटी घेऊन आणि निवेदनांद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हे अतिरिक्त शुल्क रद्द करण्याची मागणी केली होती.
कोकणवासीयांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे अतिरिक्त शुल्क रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिले. त्यानुसार कोकणवासीयांच्या भावनांचा आदर करून यंदा एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द करण्यात येत आहे. याबाबतचे परिपत्रक लवकरच एसटी प्रशासनाकडून जारी करण्यात येईल, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून सुमारे ५ हजारांहून अधिक बसेस एसटी महामंडळाकडून उपलब्ध करून दिल्या जातात. या विशेष वाहतुकीसाठी राज्यातील इतर विभागांतून दोन-तीन दिवस आधी बसेस मागविल्या जातात.
एकेरी गट आरक्षणामुळे कोकणात प्रवाशांना सोडल्यानंतर या बसेस रिकाम्या परत आणाव्या लागतात. त्यामुळे एसटी महामंडळावर इंधनाचा खर्च तसेच चालक-वाहकांच्या अतिकालीन भत्त्याचा अतिरिक्त भार पडतो. त्यातच डिझेलच्या किमती आणि कर्मचाऱ्यांच्या अतिकालीन भत्त्यात वाढ झाल्याने एसटीच्या तोट्यात मोठी वाढ होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून एसटी महामंडळाने यंदापासून एकेरी गट आरक्षणावर ३० टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, एका कुटुंबात ३०% अतिरिक्त शुल्क हे पुर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांला लागू होते. अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत आणि ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना १५% भार सहन करावा लागला असता. सध्या खासगी वाहतूकदारांनी वाढलेली तिकीट दर वाढ लक्षात घेता ही अतिरिक्त शुल्क वाढ किफायतशीर होती.
मात्र, कोकणवासीयांच्या भावना आणि मागणी लक्षात घेऊन हे शुल्क आता रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला होणारा संभाव्य आर्थिक तोटा इतर मार्गांवरील प्रवासी वाहतूक वाढवून भरून काढावा, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.
Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटींची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू; १९ जखमी






