
एसटी कर्मचाऱ्यांचा संताप वाढला! पीएफ, ग्रॅच्युइटी, दिवाळी भेट अन् महागाई भत्ता रखडला; आंदोलनाचा इशारा
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी (३ नोव्हेंबर) झालेली बैठक निष्फळ ठरली. निधीअभावी कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी देण्यात अडचणी येत असल्याचे सांगत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांवर अद्याप तोडगा निघालेला नाही. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी ही माहिती दिली.(MSRTC Employees)
गेल्या बारा महिन्यांपासून वेतनासाठीच १,३३८.१५ कोटींची तूट असताना पीएफ, ग्रॅच्युइटी, दिवाळी भेट आणि महागाई भत्त्यासारखे लाभ कसे मिळणार? असा सवाल बरगे यांनी यावेळी उपस्थित केला. या आर्थिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. वारंवार मागण्या करूनही आर्थिक प्रश्न मार्गी लागत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या नाराजीत भर पडत असल्याचे बरगे यांनी स्पष्ट केले.
ST Bus Employee: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून ३९१ …
एसटी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन संपावेळी त्रिसदस्यीय समितीसमोर राज्य शासनाने महामंडळाला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नसल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर महामंडळाने शासनाविरोधात अवमान याचिका दाखल करावी, अशी ठाम मागणी संघटनेने बैठकीत केली. केवळ दर महिन्याला शासनाला पत्र पाठवून कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न सुटणार नाहीत, अशी भूमिका श्रीरंग बरगे यांनी मांडली.
एसटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न केवळ महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या स्तरावर सुटणारे नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी, तसेच अर्थमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी बरगे यांनी केली. प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळत नसल्याने आता आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, मंगळवारी झालेल्या बैठकीत एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी येत्या ६ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ही बैठक संपली. आता ६ नोव्हेंबरच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांवर काय निर्णय होतो, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. या बैठकीतही ठोस निर्णय न झाल्यास एसटी महामंडळात पुन्हा आंदोलन छेडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या प्रश्नावर काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
MSRTC employees: एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष …
Ans: एसटी महामंडळाकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे कर्मचाऱ्यांची प्रलंबित आर्थिक देणी देण्यात अडचणी येत असल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे ३ नोव्हेंबर रोजी झालेली बैठक निष्फळ ठरली.
Ans: कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांमध्ये भविष्य निर्वाह निधी (PF), ग्रॅच्युइटी, दिवाळी भेट आणि महागाई भत्त्याचा समावेश आहे.
Ans: ६ नोव्हेंबर २०२६ रोजी उपमुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत पुढील बैठक होणार असल्याचे एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी आश्वासन दिले आहे.