सर्पदंशाचे मृत्यू निम्म्यावर आणण्यासाठी रोडमॅप! सर्पदंशापासून उपचारापर्यंतची संपूर्ण साखळी मजबूत करण्यावर भर
Mumbai News: सर्पदंशानंतर रुग्णाला वेळेत उपचार न मिळाल्याने होणारे मृत्यू आणि गंभीर गुंतागुंत रोखण्यासाठी महाराष्ट्राने आता २०३० पर्यंत सर्पदंशामुळे होणारे मृत्यू निम्म्यावर आणण्याच्या दिशेने रोडमॅप तयार करण्याचे नियोजन केले आहे. सर्पदंश ही केवळ आरोग्य विभागाची जबाबदारी न मानता वन, पशुसंवर्धन, आदिवासी विकास, पंचायत व ग्रामीण विकास आणि कृषी विभागाला या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. यासाठी हाफकिन इन्स्ट्युिटमध्ये नुकतीच सल्लामसलत बैठक झाली.या बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि जॉन स्नो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहभागातून विविध विभागांकडून सूचना मागविण्यात आल्या.(फोटो सौजन्य – AI)
बैठकीत सर्पदंशाच्या घटनेपासून रुग्णालयातील उपचार आणि त्यानंतरच्या पाठपुराव्यापर्यंतची संपूर्ण उपचार साखळी तपासण्यात आली. ‘समुदाय, प्रथम प्रतिसाद, आरोग्य सुविधा, संदर्भ सेवा, पाठपुरावा या प्रत्येक टप्प्यावर असलेल्या त्रुटी आणि गरजा ओळखण्यावर भर देण्यात आला. पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर, डॉ. सदानंद राऊत आणि डॉ. दिलीप पुंडे यांनी सर्पदंशाच्या रुग्णांचे निदान, उपचार आणि व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. विविध विभागांच्या प्रतिनिधींच्या चार गटांमध्ये चर्चा घेऊन प्रमुख अडचणी, प्राधान्यक्रम, जबाबदाऱ्या आणि अपेक्षित परिणाम निश्चित करण्यात आले.
बैठकीतील निष्कर्षांच्या आधारे विविध विभागांच्या भूमिका, आवश्यक कृती आणि समन्वय यंत्रणेचा समावेश असलेला रोडमॅप तयार केला जाणार आहे. त्याची प्राथमिक रूपरेषा पुढील एक महिन्यात निश्चित करण्याचे नियोजन आहे. सर्पदंश प्रतिबंध, जनजागृती, तातडीची वैद्यकीय मदत आणि प्रभावी रुग्ण व्यवस्थापन यावर या आराखड्यात भर राहणार आहे.
राज्यशासनाने राबविलेल्या सर्प दंश प्रतिबंध कार्यक्रमामुळे सर्पदंश झालेल्या व्यक्तीची अचूक नोंद होईल. शिवाय ठरवलेल्या उपचार धोरणाची मदत होईल. तसेच सर्पदंश लस उपलब्ध आहे की नाही याची माहिती लगेचच मिळेल, जन जागृती, डॉक्टरांना प्रशिक्षण आणि योग्य उपचार मिळाल्यास सर्प दंशाने होणारे मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमाण कमी होईल. – डॉ. सदानंद राऊत, सदस्य, राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार सर्पदंश समिती माहिती दिली आहे.






