अभाविपच्या सदस्यता अभियानाचा नवा विक्रम; ६० हून अधिक महाविद्यालयांतून ५० हजार विद्यार्थी जोडले
नीता परब : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) मुंबई महानगरातील सदस्यता अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, ६० हून अधिक महाविद्यालयांमध्ये अभियान राबवत ५० हजार सदस्यत्वाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार करण्यात आला आहे. विद्यार्थीहिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य करण्यासोबतच राष्ट्रहित आणि राष्ट्रनिर्माणाच्या विचारांशी विद्यार्थ्यांना जोडण्याच्या अभाविपच्या प्रयत्नांना मिळालेला हा सकारात्मक प्रतिसाद असल्याचे अभाविपकडून सांगण्यात अाले.
मुंबई महानगरातील विविध महाविद्यालयांमध्ये अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात अाला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच सामाजिक प्रश्नांची माहिती घेत त्यांना अभाविपच्या कार्याची भूमिका समजावून सांगण्यात आली व विद्यार्थ्यांनीही या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मोठ्या संख्येने अभाविपचे सदस्यत्व स्वीकारले, असल्याचे अभाविपचे म्हणणे अाहे.
५० हजार सदस्यत्वाचा टप्पा हा केवळ एक आकडा नसून विद्यार्थी शक्तीच्या संघटित सहभागाचे प्रतीक आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समस्या, शैक्षणिक सुविधा, विद्यार्थी हक्क, महाविद्यालयीन परिसरातील विविध प्रश्न यासाठी आवाज उठविण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्राप्रती जबाबदारीची भावना निर्माण करण्याचे काम अभाविपच्या माध्यमातून केले जात असल्याचे परिषदेचे म्हणणे अाहे.
मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार म्हणाले, “मुंबईतील ६० हून अधिक महाविद्यालयांमध्ये राबविण्यात आलेल्या सदस्यता अभियानातून ५० हजार विद्यार्थी अभाविपशी जोडले जाणे ही अत्यंत समाधानाची बाब आहे. हा आकडा विद्यार्थी शक्तीने विद्यार्थीहित आणि राष्ट्रहिताच्या विचारांना दिलेली साथ दर्शवितो. या सदस्यांच्या सहभागातून आगामी काळात विद्यार्थीहिताचे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”
या अभियानाच्या यशामागे अभाविपच्या प्रत्येक कार्यकर्त्याची मेहनत आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत महाविद्यालयांच्या कॅम्पसच्या प्रवेशद्वारांवर उभे राहून कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कोणत्याही प्रकारचा आग्रह न करता विद्यार्थ्यांना अभाविपच्या कार्याची माहिती देत सदस्यत्वाचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने दिलेला प्रतिसाद हीच या अभियानाची खरी ताकद आहे.”
विद्यार्थीहित आणि राष्ट्रहित यांची सांगड घालत सक्षम युवा शक्ती घडविणे हा अभाविपच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थी हा केवळ महाविद्यालयीन प्रश्नांपुरता मर्यादित न राहता समाज आणि राष्ट्राच्या भवितव्यात सक्रिय योगदान देणारा घटक आहे, या भूमिकेतून विद्यार्थ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
५० हजार सदस्यत्वाच्या या टप्प्यानंतर मुंबई महानगरातील अभाविपचे कार्य अधिक व्यापक करण्याचा निर्धार करण्यात आला असून, नव्याने जोडलेल्या सदस्यांच्या माध्यमातून विद्यार्थीहिताचे प्रश्न, सामाजिक उपक्रम, शैक्षणिक विषय आणि राष्ट्रनिर्माणाशी संबंधित विविध उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.
५० हजार सदस्यत्वाचा हा टप्पा अभाविपच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ असून, विद्यार्थीहिताच्या कार्याला आणि राष्ट्रनिर्माणाच्या संकल्पाला मिळालेली युवा शक्तीची नवी ऊर्जा असल्याचे सांगण्यात अाले.






