Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 12.09.2026
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि उपोषणाच्या इशाऱ्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. नेपाळ आणि तिबेट सीमेवरील भीषण ढगफुटी आणि महापुरातील मृतांचा आकडा ५७० पार गेला असून, महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षित आणण्यासाठी बचावकार्य वेगाने सुरू आहे.
राज्यातील अनेक भागांत पावसाची उघडीप असली तरी उत्तर आणि पूर्व भारतातील नद्यांना आलेल्या पुरामुळे किनारी भागात सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी मर्यादित फेरबदलासह सावध पातळीवर व्यवहार करत आहेत.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) ऑगस्ट महिन्यात भारतीय भांडवली बाजारात तब्बल १३,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करत पुनरागमन केले आहे. महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव करत विजयी सुरुवात केली आहे.
03 Sep 2026 12:36 PM (IST)
वैदवाडी परिसरात तरुणाला हिसका मारून त्याच्या खिशातील एक हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेऊन आरोपी पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अली बागवान (रा. फुले वस्ती, हडपसर) याच्याविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुकेश लोरीक निषाद (वय ३०, रा. वेदूवाडी सिग्नल जवळ, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, दोन दिवसांपूर्वी दुपारी एकच्या सुमारास तक्रारदार त्रिलोक बार परिसरातून जात होते. त्यावेळी आरोपी अली बागवान याने त्यांना हिसका मारला. त्यानंतर त्यांच्या खिशातून एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि आरोपी तेथून पळून गेला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी आरोपीचे नाव तक्रारदाराला सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने वानवडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक मोकाटे पुढील तपास करीत आहेत.
03 Sep 2026 12:24 PM (IST)
मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर चारचाकी चालक तरुणाची कार अडवून त्याच्याशी वाद घालण्याचा बहाणा करत चौघा चोरट्यांनी त्याला मारहाण केली आहे. त्यानंतर कारच्या खिडकीतून हात घालून तरुणाच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून चोरटे पसार झाले आहेत. ही घटना ३० ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील बागणी येथील ३४ वर्षीय तरुणाने नऱ्हे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
03 Sep 2026 12:12 PM (IST)
काखे (ता. पन्हाळा) येथे अनैतिक संबंधांच्या वादातून एका विवाहीत महिलेचा तिच्याच घराच्या अंगणात धारदार चाकूने सपासप वार करून निघृण खून करण्यात आल्याची थरारक घटना बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पूजा अविनाश दाभाडे (वय ३३, रा. काखे) असे मृत महिलेचे नाव असून, सुरेश मधुकर दाभाडे (वय ३५) याने हा हल्ला केला आहे. भरदिवसा घडलेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे काखे परिसरासह संपूर्ण पन्हाळा तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारी पूजा दाभाडे या घरात एकट्याच असताना आरोपी सुरेश दाभाडे तिथे आला. जुन्या अनैतिक संबंधांच्या कारणावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला. संतापाच्या भरात सुरेशने सोबत आणलेल्या धारदार चाकूने पूजा यांच्यावर अंगणातच अंधाधुंद वार केले. पूजा यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावून आले असता, आरोपी सुरेश घटनास्थळावरून तातडीने पसार झाला.
31 Aug 2026 05:37 PM (IST)
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर झालेल्या कथित ‘शुद्धीकरणा’च्या प्रकारावरून मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकाराचा निषेध करत मुंबई युवक काँग्रेसने दादर येथील भाजप कार्यालयासमोर आंदोलन केले. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीच्या प्रती जाळून भाजप आणि आरएसएसच्या कथित मनुवादी आणि जातीयवादी मानसिकतेचा निषेध केला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला.
31 Aug 2026 05:27 PM (IST)
मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानची फेरीबोट जलवाहतूक सेवा १ सप्टेंबरपासून सुरु करण्यास मेरीटाईम बोर्डाने अनुमती दिली आहे. मुंबईला जोडणारा हा सर्वांत जवळचा आणि वेळेची बचत करणारा मार्ग असून वर्षातील तीन महिने ही सेवा बंद असते, त्याचा परिणाम येथील पर्यटन व्यवसायावर जाणवत असतो. त्यामुळे फेरीबोट सेवा (Ferry Boat ) कधी सुरु होणार याकडे येथील प्रवाशांसह पर्यटन व्यावसायिकांचे लक्ष असते. वाचा सविस्तर,,,
31 Aug 2026 05:17 PM (IST)
‘मी सरकारचा भाग नाही, मी आमदार आणि लोकप्रतिनिधी आहे. संवादाच्या टेबलवर मी बसत नाही,’ असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर,,,
31 Aug 2026 05:10 PM (IST)
ग्रँड स्लॅम स्पर्धेतील सर्वात यशस्वी पुरुष खेळाडू नोव्हाक जोकोविचसाठी यूएस ओपन २०२६ (US Open 2026) ची सुरुवात अत्यंत निराशाजनक ठरली. न्यूयॉर्कमध्ये स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सर्बियन खेळाडू मारियानो नवोनेने जोकोविचला पराभूत करून एक मोठा धक्का दिला. या पराभवामुळे जोकोविच यूएस ओपनमधून बाहेर पडला आहे. २५ वर्षीय नवोनेने ३९ वर्षीय जोकोविचला ७-६, ५-७, ६-४, २-६, ६-१ असे हरवून एक मोठा उलटफेर घडवला. या मोठ्या पराभवामुळे नोव्हाक जोकोविचचे २५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न पहिल्याच सामन्यात भंगले. वाचा सविस्तर,,,
31 Aug 2026 05:00 PM (IST)
सरकारी क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई येथील अखिल भारतीय भौतिक चिकित्सा एवं पुनर्वास संस्थान (AIIPMR) मध्ये कंत्राटी स्वरूपातील स्पेशालिस्ट पदांच्या भरतीसाठी थेट मुलाखतीचे (Walk-in-Interview) आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या या संस्थेत एकूण ४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
31 Aug 2026 04:50 PM (IST)
महिला आशिया कप २०२६ ( Womens Asia Cup 2026) स्पर्धेतील तिसरा सामना भारत आणि थायलंड यांच्यात खेळला गेला. भारतीय संघाने आपल्या मोहिमेची दणक्यात सुरुवात केली. भारताने ९४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा सामना अष्टपैलू दीप्ती शर्मासाठी खास होता. हा दीप्तीच्या कारकिर्दीतील १५० वा टी२० आंतरराष्ट्रीय सामना होता तिने या सामन्यात एक नवीन विश्वविकम रचला. ती आता महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज बनली आहे. थायलंडविरुद्धच्या सामन्यात दीप्तीने ७ चेंडूंमध्ये ३ विकेट्स घेतले.
31 Aug 2026 04:40 PM (IST)
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
31 Aug 2026 04:30 PM (IST)
हॉकी विश्वचषक २०२६ चा ( Hockey World Cup 2026 ) अंतिम सामना रविवार, ३० ऑगस्ट रोजी खेळला गेला. हा सामना बेल्जियममधील वावर येथील बेल्फियस हॉकी एरिनामध्ये जर्मनी आणि स्पेन यांच्यात रंगला. या सामन्यात जर्मनीने उत्कृष्ट कामगिरी करत स्पेनला पराभूत करून विजेतेपद पटकावले. जर्मनीने स्पेनला १-० ने हरवून आपले विश्वचषक विजेतेपद कायम राखले. यासह जर्मनीने आपले चौथे हॉकी विश्वचषक विजेतेपद जिंकले.
31 Aug 2026 04:20 PM (IST)
कोकणात उद्योग येत नाहीत हा जुना ठपका पुसून काढत रत्नागिरीच्या स्थानिक उद्योजकांनी औद्योगिक आणि पर्यटन विकासाला नवी गती दिली आहे. ‘जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६’ च्या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल २ हजार १५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले . यामध्ये रत्नागिरीच्या पर्यटन वैभवात भर घालणाऱ्या १०० कोटीच्या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पासह मोठ्या औद्योगिक प्रकल्पांचा समावेश आहे.
31 Aug 2026 04:10 PM (IST)
“सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत ५ सप्टेंबर 2026 रोजी नियोजित असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या मोर्चाला बंदी घालण्यास नकार दिला आहे. या मोर्चामुळे कोणतीही अनुचित घटना घडू शकते, असे मानण्यास सध्या कोणतेही सबळ कारण नाही.” असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालायाने नोंदवले आहे. १२-१३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेनंतरपर्यंत, ल्युटियन्स दिल्लीत ५ सप्टेंबर रोजी होणारा हा मोर्चा थांबवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
31 Aug 2026 03:59 PM (IST)
Amit Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (MNS) अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या पुणे दौऱ्याची सुरुवातच एका वेगळ्या वादामुळे चर्चेत आली आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अमित ठाकरे आज (31 ऑगस्ट 2026) शिवाजीनगर येथील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात पोहोचले. मात्र, प्राचार्यांच्या कार्यालयातील नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रावरून यावेळी नवा वाद निर्माण झाला.
31 Aug 2026 03:50 PM (IST)
Wardha News : जिल्ह्यातील औद्योगिक गती देण्यासाठी विकासाला एमआयडीसीतील उपलब्ध भूखंडांचा प्रभावी वापर करावा. भूखंड घेऊनही उद्योग सुरू न करणाऱ्या उद्योजकांचा सविस्तर आढावा घेऊन भूखंडधारकांची ए, बी आणि सी अशा त्रिस्तरीय श्रेणीत वर्गवारी करावी. प्रत्यक्ष उद्योग सुरू असलेल्यांना ‘ए’, उद्योग सुरू करून सध्या बंद असलेल्यांना ‘बी’, तर भूखंड घेऊन अद्याप उद्योग सुरू न करणाऱ्यांना ‘सी’ श्रेणीत समाविष्ट करून नियमानुसार कार्यवाही करावी.
31 Aug 2026 03:40 PM (IST)
उझबेकिस्तानच्या अधिकृत दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी ताश्कंद येथे एका विशेष कार्यक्रमादरम्यान प्राचीन तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चे महत्त्व अधोरेखित केले. ताश्कंद स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ ओरिएंटल स्टडीज येथील महात्मा गांधी केंद्राला भेट दिली असता, पंतप्रधानांनी कवी आणि तत्त्वज्ञान श्रेष्ठ तिरुवल्लुवर यांच्या या अजरामर रचनेचे मुक्तकंठाने कौतुक केले.
31 Aug 2026 03:35 PM (IST)
Nagpur News : रिंगरोडच्या बांधकामासाठी अनेक वर्षांपूर्वी संपादित जमीन आणि पाडलेल्या घराची भरपाई मागणाऱ्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च्च न्यायालयाने राज्य सरकार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला तीव्र शब्दांत फटकारले आहे.
31 Aug 2026 03:25 PM (IST)
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून या एक्सप्रेस महामार्गावर दिवसेंदिवस अपघात व लुटमारीच्या घटनात वाढ होत असल्याने, या महामार्गावर प्रवास करून धोक्याचे झाले असल्याचे मत व्यक्त होत आहे. येथील प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी शासनाने फुगाळे बोगदा ते भिवंडी दरम्यान अपघातग्रस्तांना तात्काळ उपचार मिळून त्यांचे जीव वाचवावेत यासाठी अत्याधुनिक दर्जाचे रुग्णालय होण्याची गरज आहे तर या महामार्गावर दिवसेंदिवस लुटमारीच्या घटना वाढत असल्याने महामार्गालगत स्वतंत्र पोलिस ठाणे असणे गरजेचे असून रात्रीच्या वेळी पोलीस गस्त घालणे गरजेचे आहे.
31 Aug 2026 03:20 PM (IST)
Nepal Flood: नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून महापुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार उडाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेकजण बेपत्ता झाल्याचं समोर आलं आहे. पुरामुळे नेपाळमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. याच महापुराच्या संकटात अभिनेत्री मानसी पारेखही अडकली होती.
31 Aug 2026 03:01 PM (IST)
नेपाळच्या (Nepal Floods) नुवाकोट जिल्ह्यात निसर्गाने धारण केलेल्या रौद्ररुपादरम्यान एका मुख्याध्यापकाच्या समयसूचकतेमुळे महाभयंकर अनर्थ टळला आहे. त्रिशुली खोऱ्यातील त्रिभुवन त्रिशुली माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र दवाडी यांच्या प्रसंगावधानामुळे शाळेतील तब्बल १,६४३ मुलांचा जीव वाचला आहे.
31 Aug 2026 02:59 PM (IST)
आमदार महेंद्र दळवी हे वारंवार सुनिल तटकरे आणि अनिकेत तटकरे यांच्यावर टीका करत आहेत. दळवी यांनी अनिकेत तटकरे यांना 'सरोगशी बाळ' म्हटले, तर सुनिल तटकरे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अस्तित्व संपले असल्याची टीकाही केली. या टीकेला आमदार अनिकेत तटकरे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय.
31 Aug 2026 02:50 PM (IST)
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील कोथळीमध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना महादेव जानकर यांनी एकनाथ खडसे यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचे कौतुक केले. खडसे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला राजकारण आणण्याची गरज नव्हती. हा सर्वपक्षीय कार्यक्रम असल्याने सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहायला हवे होते, अशी भूमिका महादेव जानकर यांनी व्यक्त केली. एकनाथ खडसे यांच्याबद्दल मला नेहमीच आदर असून, माझ्या राजकीय जीवनात त्यांचे स्थान वेगळे आहे. खडसे हे राज्याच्या राजकारणातील दीपस्तंभ आहेत, असे महादेव जानकर यांनी म्हटले.
31 Aug 2026 02:39 PM (IST)
उत्तराखंड मधील हलद्वानीमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधातच अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी हलद्वानी येथील रामलीला मैदानातील शुद्धीकरण हवनला दलित विरोधी म्हटलं होतं. यावरूनच अनुसूचित वर्गाच्या भावना दुखावल्याचा गंभीर आरोप करत अमित कुमार नावाच्या तरूणाने राहुल गांधींविरोधात तक्रार केली आहे.
31 Aug 2026 02:30 PM (IST)
मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी उपोषण सोडणार नाही, काहीही झालं तरी मुंबईला जाणारच असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. तर मराठा आंदोलकांनी कुणालाही समजण्याआधी मुंबईत जायला सुरुवात करावी असं आवाहनही त्यांनी केलंय...
31 Aug 2026 02:21 PM (IST)
मुंबईच्या महापौरपदासाठी एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर सुरू केल्याची चर्चा आहे.. त्यावरूनच आता ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी शिंदेंवर हल्लाबोल केलाय... फोडाफोडी केल्याशिवाय शिंदेंचं मन थाऱ्यावर नसतं असा टोलाही त्यांनी लगावला आहे. त्यामुळे त्यांच्या चिरंजीवांनी त्यांच्यावर ताबडतोब उपचार करणं गरजेचं आहे. आमचे नगरसेवक कुठेही जात नाही म्हणून, अत्यंत चुकीच्या पद्दतीने दबावाखाली त्यांना ते बाद करू पाहत आहेत असही राऊत म्हणाले.
31 Aug 2026 02:10 PM (IST)
मुंब्रा येथून गणपतीची मूर्ती घेऊन जात असताना ट्रॉलीचे चाक अचानक निसटल्याने मूर्ती एका बाजूला झुकली... ही परिस्थिती पाहून काही मुस्लिम तरुण तातडीने पुढे सरसावले आणि त्यांनी मूर्तीला खाली पडू न देता ट्रॉलीचे चाक दुरुस्त केले... या अनुकरणीय घटनेमुळे राजकारण करणाऱ्यांना सलोख्याचा आणि ऐक्याचा एक मोलाचा संदेश मिळाला आहे...
31 Aug 2026 02:00 PM (IST)
जागतिक राजकारण आणि ऊर्जा बाजारात एक अतिशय चक्रावून टाकणारी ऐतिहासिक घडामोडी समोर आली आहे. जगातील सर्वात मोठ्या कच्च्या तेलाच्या उत्पादक आणि निर्यातदार देशांपैकी एक असलेल्या रशियावर (Russia Petrol Crisis) आता स्वतःच्या देशातील इंधनाची गरज भागवण्यासाठी इतर देशांकडून तयार पेट्रोल आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या भारताला रशिया गेल्या दोन वर्षांपासून सवलतीच्या दरात कच्चे तेल विकत होता, त्याच भारताकडून रशियाने जून आणि जुलै या दोन महिन्यांत तब्बल १० लाख बॅरलपेक्षा जास्त तयार पेट्रोल खरेदी केले आहे.
31 Aug 2026 01:55 PM (IST)
संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील अपघातांची भीषण मालिका थांबण्याचे नाव घेत नसून गुरुवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ आणखी एका अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघाताची नोंद झाली आहे. नागपूरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने अतिशय भरधाव वेगात जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसने पुढे चाललेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या दुर्दैवी घटनेत ६५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला असून, इतर १० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
31 Aug 2026 01:50 PM (IST)
पेट्रोलमध्ये मिसळण्यात आलेल्या इथेनॉलचे प्रमाण ग्राहकांना स्पष्टपणे सांगितले जावे, या मागणीशी संबंधित याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. याचिकेत पेट्रोल पंपावरील प्रत्येक डिस्पेन्सिंग नोजलवर इथेनॉलची अचूक टक्केवारी प्रदर्शित करण्याबरोबरच ग्राहकाला दिल्या जाणाऱ्या बिल किंवा पावतीवरही ती नमूद करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती.
31 Aug 2026 01:45 PM (IST)
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या बहुप्रतीक्षित ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दिग्दर्शक अभिषेक पाठक यांच्या या लोकप्रिय फ्रँचायझीचा तिसरा आणि शेवटचा भाग लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. या चित्रपटातून अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकर या लोकप्रिय भूमिकेत परतणार आहे.
31 Aug 2026 01:40 PM (IST)
नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून महापुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार उडाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेकजण बेपत्ता झाल्याचं समोर आलं आहे. पुरामुळे नेपाळमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. याच महापुराच्या संकटात अभिनेत्री मानसी पारेखही अडकली होती. मात्र, सुदैवाने ती सुखरूप भारतात परतली आहे. नेपाळमधील या भयावह अनुभवाबद्दल मानसीने आता भाष्य केलं असून, तिने सांगितलेला अनुभव अंगावर काटा आणणारा आहे.
31 Aug 2026 01:35 PM (IST)
मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवली सराटी येथे सुरु असलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून यावेळी त्यांनी समर्थकांना मुंबईत जाण्याचं आवाहन केलं आहे. आमरण उपोषणाचा आज (३१ ऑगस्ट 2026) तिसरा दिवस असून ५८ लाख कुणबी नोंदींची अंमलबजावणी करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. मात्र उपोषण सुरू झाल्यानंतरही सरकारकडून चर्चेसाठी कोणताही अधिकृत संपर्क झालेला नसल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.
31 Aug 2026 01:30 PM (IST)
तुम्हीही बिअरप्रेमी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. बिअरप्रेमींचे आपले स्वतःचे असे आवडीचा ब्रँड असतात. जर तुमचा आवडीचा ब्रँड ‘Bira 91’ हा असेल तर ही बातमी तुम्हाला धक्का देऊन जाईल. कारण या कंपनीच्या अडचणी पुन्हा एकदा वाढत असल्याचे दिसत आहे. ‘Bira 91’ ची मूळ कंपनी, ‘बी९ बेवरेजेस लिमिटेड’ला, काचेच्या बाटल्या बनवणारी कंपनी ‘हिंदुस्तान नॅशनल ग्लास अँड इंडस्ट्रीज लिमिटेड’ (HNGIL) कडून डिफॉल्ट नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमुळे आता तुमचा हा ब्रँड बंद होतोय की काय असा प्रश्न पडतोय? नेमकं सगळं प्रकरण काय? आणि या सगळ्या प्रकरणाचा काय परिणाम होणार आहे?
31 Aug 2026 01:25 PM (IST)
एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर बहुतांश डॉक्टर नीट पीजीमध्ये चांगले गुण मिळवून आपल्या पसंतीच्या ब्रँचमधून पोस्ट ग्रॅज्युएशन करतात. एमबीबीएसचे शिक्षण संपताना हे समजून येते की, केवळ डॉक्टर बनणेच पुरेसे नाही, तर योग्य स्पेशलाइजेशन निवडणे हे करिअरमधील सर्वात मोठे वळण ठरू शकते. मेडिकलच्या प्रत्येक ब्रँचची आव्हाने, वर्क-लाइफ बॅलन्स आणि कमाईची क्षमता वेगवेगळी असते.
31 Aug 2026 01:15 PM (IST)
कॅनडातील ग्रेटर टोरोंटो शहरात आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी उपस्थितांना संबोधित करताना जागतिक विचारसरणीवर मोलाचे भाष्य केले. ‘हिंदू विश्व बंधू – मैत्रीने जगाला स्वीकारणे’ या मुख्य संकल्पनेवर आधारित असलेल्या या कार्यक्रमाला २,००० हून अधिक अनिवासी भारतीय, हिंदू नागरिक आणि विविध समाजसेवकांनी उपस्थिती दर्शवली होती. या प्रसंगी बोलताना भागवत यांनी परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना त्यांच्या मूळ संस्कृतीची आठवण करून दिली आणि सांगितले की, आपण ज्या देशात राहतो, तिथे अत्यंत प्रामाणिक, निष्ठावान आणि जबाबदार नागरिक म्हणून योगदान देणे ही आपली प्राथमिक नैतिक जबाबदारी आहे.
31 Aug 2026 01:10 PM (IST)
मनोज जरांगे पाटील प्राण पणाला लावून आंदोलन करत आहेत, समाजाचे नेतृत्त्व करत आहेत. उपोषण करून त्यांची प्रकृती खूप खालावली आहे. मी हे स्वत: पाहिले आहे. संजय जाधव यांना निवडून आणण्यासाठी जरांगे पाटील यांची मदत झाली होती. पण जे कुणी बंडू-झंडू जाधव आहेत, जे ठाकरेंचे झाले नाहीत, ते जरांगेंचे कसे होणार? ते नेहमी नवीन आई-बाप शोधत असतात. अशा खोचक शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यावर टिका केली आहे.
31 Aug 2026 01:04 PM (IST)
आपल्याकडच्या बऱ्याच तरुणांना वाटतं अमेरिकेत गेलं की आयुष्य एकदम सेट झालं. तिकडे पैसा जास्त, गाड्या मोठ्या, रस्ते चांगले, सगळं काही भारी. म्हणूनच लाखो लोक अमेरिकेला जाण्यासाठी धडपड करत असतात. पण अमेरिकेत राहणाऱ्या पुण्याच्या एका मुलाने तिकडची दुसरी बाजू समोर आणली आहे. तो म्हणतोय, मला आता परत भारतात यायचंय. कारण अमेरिकेची हॉस्पिटल सिस्टिम खूपच त्रासदायक आहे.
31 Aug 2026 12:48 PM (IST)
केज-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावरील चंदनसावरगाव शिवारात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास कार पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. प्रमोद उर्फ सुंदर उत्तम सातपुते (वय ४५) आणि प्रशांत उर्फ महादेव दिगंबर करपे (वय ४८, दोघे रा. जवळबन) यांचा मृत्यू झाला आहे. तर दत्ता तपसे (४३, रा. चंदनसावरगाव) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
31 Aug 2026 12:36 PM (IST)
दारूच्या आहारी गेलेला मुलगा दररोज वाद घालत असल्याच्या रागातून वडिलांनी मुलाचा गळा आवळून तसेच मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वारजे माळवाडी परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी वडिल तसेच आईला पोलिसांनी अटक केली आहे. महेश भागवत गायकवाड (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ गणेश भागवत गायकवाड (वय ३४) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४), पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) आणि आणखी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिल भागवत व आई पार्वती यांना अटक केली आहे.
31 Aug 2026 12:24 PM (IST)
वैमनस्यातून टोळक्याने तरुणाला मारहाण करुन तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना पुण्यातील बिबवेवाडीत घडली आहे. याप्रकरणी टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षर महेश अडागळे (वय २५, रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी साई शिंदे, राहुल ख्याडगी, मोहन जीवन विद्यासागर (तिघे रा. शिवतेजनगर, बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, साक्षर अडागळे (दि. २७ ऑगस्ट) हा बिबवेवाडी येथील समर्थनगर परिसरातून निघाला होता. त्यावेळी आरोपींनी त्याला अडवले. ‘भावेश मोरेशी वाद का घालतो ?’, अशी विचारणा करुन आरोपींनी त्याला मारहाण केली. आरोपींनी अडागळे याच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. त्यावेळी अडागळे याच्या मित्राच्या आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी मित्राच्या आईलाही शिवीगाळ केली. भांडणात मध्यस्थी केली तर अडागळेला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी आरोपींनी त्यांना दिली. सहायक निरीक्षक शरयू देशमुख या प्रकरणाचा तपास करत आहेत.
31 Aug 2026 12:12 PM (IST)
जुन्या वादातून महापालिकेच्या कचरा गाडीवर कंत्राटी चालक म्हणून काम करणाऱ्या मामाच्या मुलाला जुन्या वादातून दोन आत्या भावांनी लोखंडी हातोडा घालून गंभीर जखमी केले. उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला आहे. तर मित्राला वाचविण्यासाठी धावलेल्या मित्रालाही मारहाण करुन गंभीर जखमी केले आहे. ही घटना ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास मदनी चौक ते टाकळकर सोसायटी परिसरात घडली आहे. फारेस अब्दुल अजिज अलकसेरी (३२, रा. कासंबरी दर्गा, पडेगाव) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी तपास करुन अवघ्या काही तासात मामेभावाचे मारेकरी अहमद खलील बादाम (वय ४०), अदनान खलील बादाम (वय ३५, दोघे रा. टाकळकर सोसायटी, बारी कॉलनी) या दोघांना ताब्यात घेतले आहे. जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
31 Aug 2026 11:50 AM (IST)
गोकुळची निवडणूक पुन्हा कायाद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. हरकतीमधील 1750 दूध संस्थेच्या सुनावणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. निवडणूक अधिकारी नारायण परजणे आज निकाल देणार आहत. सत्ताधारी किंवा विरोधकांच्या विरोधात निकाल झाल्यास पुन्हा न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
31 Aug 2026 11:40 AM (IST)
सप्टेंबर महिन्यात चित्रपटगृहांमध्ये अनेक बहुप्रतीक्षित चित्रपट रिलीज होणार आहेत. ‘मिर्झापूर: द मूव्ही’पासून ‘जीवन बीमा योजना’पर्यंत अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मात्र, ज्यांना घरबसल्या मनोरंजनाचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठीही एक मोठी अपडेट आहे. सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात ओटीटीवर अनेक चित्रपट, वेब सीरिज आणि शो प्रदर्शित होणार आहेत.
31 Aug 2026 11:30 AM (IST)
भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आता सहकार क्षेत्रातील एका महत्त्वाच्या निवडणुकीवरून थेट सामना रंगण्याची शक्यता आहे. मुंबै मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना स्वतंत्रपणे मैदानात उतरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे मुंबै बँकेच्या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप अशी थेट लढत पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
31 Aug 2026 11:20 AM (IST)
राज्यातील शासकीय आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पवित्र संकेतस्थळाच्या माध्यमातून मुलाखतीविना निवड प्रक्रियेत तब्बल १३ हजार १११ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शिफारस झालेल्या उमेदवारांमध्ये सुमारे ६० टक्के महिला आहेत. त्यामुळे शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ७ हजार ३०० हून अधिक महिला उमेदवारांना मोठी संधी मिळाली आहे.
31 Aug 2026 11:15 AM (IST)
भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होमार आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात ही सुनावणी होणार असून सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम कोर्टात युक्तीवाद करणार आहेत. नाशिक शहर, ग्रामीण आणि नगर जिल्ह्यात अशोक खरातविरोधात एकूण १७ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी १२ SIT कडे असल्याची माहिती आहे.
31 Aug 2026 11:10 AM (IST)
दिल्ली शहर वा आसपासची गावं अजूनही मुलींसाठी चांगली नाहीत हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. दिल्लीत पुन्हा एकदा हादरवून सोडणारी घडना घडली आहे. दिल्लीच्या काश्मिरी गेट परिसरातून एक भीषण घटना उघडकीस आली आहे. एका स्लीपर बसमध्ये १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला असल्याचे आता समोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी कारवाई करत बस चालक आणि वाहकाला अटक केली आहे.
31 Aug 2026 11:00 AM (IST)
उत्तर सायप्रसच्या किनारपट्टीवर एक भीषण आणि अत्यंत हृदयद्रावक सागरी अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर सायप्रसमधून तुर्कस्तानकडे निघालेली एक प्रवासी फेरी सुमारे २७० प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जात असताना अचानक समुद्रात उलटली (Boat Accident) . या दुर्दैवी घटनेत किमान ८ जणांचा बुडून मृत्यू झाला असून २५ हून अधिक जण अद्याप बेपत्ता आहेत. अपघाताची बातमी समजताच स्थानिक आपत्कालीन यंत्रणा आणि सागरी सुरक्षा दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव मोहीम सुरू केली. आतापर्यंत २३७ प्रवाशांना समुद्रातून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.
31 Aug 2026 10:52 AM (IST)
अथांग पसरलेल्या आधुनिक डिजिटल युगात जिथे मोबाईलवरील एका ‘क्लिक’वर किंवा ‘इन्स्टंट मेसेज’द्वारे हजारो मैल दूर असलेल्या व्यक्तीशी संवाद साधला जातो, तिथे पत्रलेखनाची कला हळूहळू लोप पावत चालल्याचे दिसते. मात्र, व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा सोशल मीडियाच्या गर्दीत आजही हस्तलिखित पत्रांचे (Handwritten Letters) मोल अमूल्य आणि अजोड मानले जाते. दरवर्षी १ सप्टेंबर हा दिवस जगभरात ‘जागतिक पत्रलेखन दिन’ (World Letter Writing Day) म्हणून अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस केवळ कागद आणि शाईचा उत्सव नसून मानवी नात्यांमधील ओलावा, आपुलकी आणि भावनांचा खजिना जतन करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
31 Aug 2026 10:42 AM (IST)
मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची आई आणि मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं १६ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला होता. वयाच्या ६९व्या वर्षी ज्योती चांदेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या ज्योती चांदेकर यांनी ‘ठरलं तर मग’ या मालिकेतूनही प्रेक्षकांची मनं जिंकली होती.






