
एकल वापराच्या प्लास्टिकबाबत पालिका ॲक्शन मोडवर! कठोर कारवाईचे विधी समिती अध्यक्षांचे निर्देश
Mumbai News: मुंबई शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या तसेच एकल वापराच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या फेरीवाले, दुकानदार आणि मोठ्या गोदामधारकांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश विधी समितीच्या अध्यक्षा दिक्षा हर्षद कारकर यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. महापालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाला पत्र पाठवून त्यांनी मुंबईतील सर्व २६ प्रशासकीय विभागांमध्ये तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत.
डोंबिवली ते कारगिल देशभक्तीची अनोखी सफर! रोहित आचरेकर आणि साथीदारांचा प्रवास दहीहंडी उत्सवात पूर्ण
मुंबई शहरात दररोज सरासरी ६,३०० मेट्रिक टनांहून अधिक कचरा गोळा होतो. या कचऱ्यामध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी घनतेच्या प्लास्टिक पिशव्यांचे प्रमाण सर्वाधिक असते. हे प्लास्टिक सहज नष्ट होत नसल्यामुळे पावसाळ्यात शहरातील नाले आणि गटारे तुंबून पाणी साचण्याच्या गंभीर समस्या उद्भवतात. याशिवाय प्लास्टिकचे विघटन होण्यास बराच कालावधी लागत असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत असून मुंबईकरांना प्रदूषणाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, याकडे कारकर यांनी लक्ष वेधले.
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमांतर्गत नोंदणीकृत असलेल्या मुंबईतील सर्व विभागांमधील छोट्या-मोठ्या आस्थापना, २६ गोदामे आणि दुकानांची संबंधित अधिकाऱ्यांमार्फत तातडीने पाहणी करण्यात यावी.तपासणीदरम्यान बंदी घातलेले किंवा ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक आढळल्यास संबंधितांवर कसलीही गय न करता जागेवरच दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश पत्रात देण्यात आले आहेत.प्रशासनाने या मोहिमेवर जातीने लक्ष ठेवून केलेल्या कारवायांचा सर्व सविस्तर अहवाल त्वरित सादर करण्याचे आदेशही दिक्षा कारकर यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.